श्रीहरिकोटा येथे 3,985 कोटी रुपये खर्चून निर्मिती करणार : केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
श्रीहरिकोटा येथे आणखी एका लाँच पॅडच्या (उपग्रह प्रक्षेपण केंद्र) निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने गुरुवारी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसऱ्या लाँच पॅडच्या बांधकामाला हिरवा कंदील दाखविला. या प्रकल्पावर एकूण 3,985 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
इस्रोच्या ‘नेक्स्ट जनरेशन लाँच व्हेईकल’साठी (एनजीएलव्ही) आवश्यक असलेल्या लाँच इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास केला जाणार आहे. याव्यतिरिक्त नव्याने निर्मिती होणारे प्रक्षेपण केंद्र श्रीहरिकोटा येथील दुसऱ्या लाँच पॅडसाठी बॅकअप (स्टँडबाय) म्हणून देखील काम करेल, असे वैष्णव यांनी स्पष्ट केले. या प्रक्षेपण केंद्राच्या निर्मितीमुळे भारताच्या भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमांसाठी प्रक्षेपण क्षमता वाढेल, असे सरकारने एका निवेदनात म्हटले आहे.
प्रकल्प चार वर्षांत पूर्ण होणार
नव्याने निर्मिती होणाऱ्या तिसऱ्या लाँच पॅडचे बांधकाम चार वर्षांत पूर्ण केले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. या प्रकल्पामुळे इस्रोची भविष्यातील प्रक्षेपण क्षमता लक्षणीयरित्या वाढेल आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला नवीन उंचीवर नेण्यास मदत होईल, असा दावा केला जात आहे.
इस्रोच्या अनुभवातून लाँच पॅडची निर्मिती
तिसरे लाँच पॅड केवळ ‘एनजीएलव्ही’च नाही तर एलव्हीएम-3 वाहनांना देखील समर्थन देण्यासाठी डिझाईन केले जाईल. ज्यामध्ये सेमीक्रायोजेनिक स्टेज आणि ‘एनजीएलव्ही’च्या विस्तारित आवृत्त्यांचा समावेश आहे. हे लाँच पॅड इस्रोचा अनुभव आणि उद्योग सहभाग एकत्रित करून विकसित केले जाईल. तसेच विद्यमान लाँच कॉम्प्लेक्सच्या सुविधाही एकत्रित केल्या जातील.









