तीन खुनांचा लावला तपास : जिल्हा पोलीसप्रमुखांकडून कौतुक : दोघा महिलांसह सहा जणांना अटक
बेळगाव : एखाद्या शत्रूला संपविण्यासाठी गुन्हेगारांना सुपारी देऊन त्यांचा गेम केला जातो. प्रतिस्पर्धी टोळीच्या म्होरक्यांना संपविण्यासाठीही सुपारी दिली जाते. जमीन वाद, आर्थिक व्यवहार, अनैतिक संबंध आदी कारणातून सुपारी खून घडतात. ग्रामीण भागातही सुपारी खुनाचे प्रकार वाढीस लागले असून आपल्याच कुटुंबातील व्यक्तींना संपविण्यासाठी सुपारी देण्याचे प्रकार सुरू आहेत. यमकनमर्डी पोलिसांनी सुपारी घेऊन तिघा जणांचा खून करणाऱ्या त्रिकुटासह सहा जणांना अटक केली आहे. सुपारी घेतल्यानंतर गोळीबार करून किंवा धारदार शस्त्राने वार करून या त्रिकुटाने खून केले नाहीत. थंड डोक्याने ज्याचा खून करायचा आहे, त्याला दारू पाजवून कुंदरगी डोंगरावर नेऊन दोरीने गळा आवळून खून करण्यात आले आहेत.
खुनानंतर हृदयाघात, अपघात भासवून त्या मृतदेहांची विल्हेवाटही लावण्यात आली आहे. ग्रामीण भागात सुपारी घेऊन थंड डोक्याने खून करणाऱ्या त्रिकुटाबरोबरच त्यांना खुनाची सुपारी देणाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी बुधवारी पोलीस मुख्यालयात पत्रकारांना ही माहिती दिली आहे. आकाश बसलिंगप्पा गोकावी, रा. हट्टीआलूर, त्याचा मित्र रमेश लगमाप्पा माळगी, रा. हट्टीआलूर, अप्पण्णा मुशाप्पा नाईक, रा. पाच्छापूर, माला महांतेश सुटगन्नावर, रा. हट्टीआलूर, यल्लव्वा नागाप्पा मऱ्याप्पगोळ, नागाप्पा सिद्धाप्पा माळगी, रा. हट्टीआलूर अशी अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत. सुपारी घेऊन खून करणाऱ्या त्रिकुटाने तीन खुनांची कबुली दिली आहे.
30 हजारासाठी…
एप्रिल 2024 मध्ये हट्टीआलूर येथील महांतेश भीमाप्पा सुटगन्नावर (वय 38) याचा झोपेतच मृत्यू झाल्याचे सांगून त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आठ महिन्यांनंतर महांतेशचा मृत्यू हृदयाघाताने झाला नसून त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. महांतेशची पत्नी माला सुटगन्नावर हिला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता पतीच्या जाचाला कंटाळून मालाने आकाश गोकावीला पतीचा काढा काढण्यासाठी 70 हजार रुपयांची सुपारी दिली होती. मालाने आकाशला फोन पे च्या माध्यमातून 30 हजार रुपये दिले होते. आपल्या सहकाऱ्यांना पैसे द्यावे लागणार म्हणून आकाशने एकट्यानेच हा खून केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी महांतेशची पत्नी माला व त्याचा खून करणारा आकाश गोकावी यांना अटक झाली आहे. कुंदरगीच्या डोंगरावर नेऊन दारू पाजवून गळा दाबून महांतेशचा खून केल्याचे उघडकीस आले असून खुनानंतर त्याचा मृतदेह आपल्या आल्टो कारमधून आणून मालाच्या घरी ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी मालाने दारुच्या नशेत आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांना व गावकऱ्यांना सांगितले. त्यानंतर महांतेशच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. महांतेशचा भाऊ कल्लाप्पा सुटगन्नावर याने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करून दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.
पतीसाठी 3 लाखांची सुपारी
जून 2022 रोजी या टोळीने पहिला खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. हट्टीआलूर येथील नागाप्पा विठ्ठल मऱ्याप्पगोळ (वय 34) याचा खून करण्यात आला आहे. नागाप्पाची पत्नी यल्लव्वा मऱ्याप्पगोळ हिचे नागाप्पा सिद्धाप्पा माळगी याच्याबरोबर अनैतिक संबंध होते. पतीला त्याची माहिती मिळाली होती. पत्नीचे अनैतिक संबंध उघडकीस आल्यानंतर नागाप्पाने पत्नी यल्लव्वा व तिचा प्रियकर नागाप्पा माळगी या दोघा जणांना जाब विचारला होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्यासाठी आकाश गोकावीला 3 लाखांची सुपारी देण्यात आली होती. आकाश व त्याच्या साथीदारांनी सावळगी जत्रेच्या दिवशी पार्टीसाठी म्हणून नागाप्पा मऱ्याप्पगोळला बोलावून नेले. कुंदरगीच्या डोंगरावर दारू पाजून गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. परकनट्टीजवळ रेल्वेरूळावर मृतदेह टाकून देऊन नागाप्पा मऱ्याप्पगोळने आत्महत्या केल्याचे भासविण्यात आले. या प्रकरणाचाही उलगडा झाला असून नागाप्पाची पत्नी यल्लव्वा व तिचा प्रियकर नागाप्पा माळगी यांनाही अटक झाली आहे.
खून करून भासवला अपघात
मार्च 2023 मध्ये या टोळीने आणखी एक खून केल्याचे उघडकीस आले आहे. विठ्ठल लगमाप्पा माळगी (वय 30) रा. हट्टीआलूर याचा खून करण्यात आला आहे. विठ्ठलच्या खुनात त्याचा सख्खा भाऊ रमेश माळगी याचा सहभाग आढळून आला आहे. सुपारी घेऊन खून करणाऱ्या आकाश गोकावीच्या टोळीनेच कुंदरगीच्या डोंगरावर दारू पाजून गळा आवळून विठ्ठलचा खून केला आहे. त्यानंतर घराजवळच मोटरसायकल अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले आहे. खून झालेल्या विठ्ठलने आपली शेतजमीन गहाण ठेवून 22 लाख रुपये कर्ज उचलले होते. भावामुळे आता आपले जीवन उद्ध्वस्त होणार या विचाराने त्याचा भाऊ रमेश माळगीने आकाश गोकावीला सुपारी देऊन विठ्ठलचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. अपघात भासवून पुरावे नष्ट करण्यासाठी आपल्याच शेतात मृतदेह जाळण्यात आला आहे. सुपारी घेऊन खून करणाऱ्या तिघा जणांसह सुपारी देणाऱ्या दोन महिला व एका महिलेच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
तीन खुनांचा शोध…
दोन-तीन वर्षांपासून सुपारी घेऊन पचविलेले खून यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन वर्षांत घडलेल्या तीन खुनांचा शोध लावला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. के. मण्णीकेरी, के. बी. चंडुरी, एस. बी. पुजेरी, पी. एम. अरबळ्ळी, शंकर चौगला, एल. बी. हमानी, सुनील चंदरी, पी. डी. गवानी, राजश्री नाईक, माला सनदी आदींचा समावेश असलेल्या पथकाने तीन खून प्रकरणात दोन महिलांसह सहा जणांना अटक केली आहे. दोन मृतदेहांवर अग्निसंस्कार करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. केवळ महांतेश सुटगन्नावरचा मृतदेह दफन करण्यात आला असून न्यायालयाची परवानगी घेऊन तो पुन्हा उकरून काढण्यात येणार आहे. जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी कौतुक केले आहे.









