शेतकरी भूमिहीन : शेतीपिकांचे नुकसान
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास,रिंगरोड यासाठी सुपीक जमिनी घेतल्या जात असताना आता पुन्हा एकदा विद्युत विभागाकडून उच्च विद्युतभारीत वाहिन्या घालण्यासाठी शेतीमध्ये मोठमोठे खड्डे काढले जात आहेत. सुपीक जमिनीत पीक असतानाही टॉवर उभा करण्यासाठी मोठे खड्डे काढून पिकांची नासाडी करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले असून शेतजमीनच नसेल तर उदरनिर्वाह कसा करायचा? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
वडगाव, येळ्ळूर, जुने बेळगाव, मच्छे, मजगाव येथील सुपीक जमिनीतून हलगा-मच्छे बायपास काढण्यात आला. यामुळे शेकडो एकर शेती गेल्यामुळे शेतकरी भूमिहीन झाला. त्यानंतर शहराला लागून रिंगरोड केला जाणार असून भूसंपादन केले जात आहे. इतके होऊन शिल्लक राहिलेल्या जमिनीत वीजवाहिन्यांसाठी टॉवर उभे केले जात आहेत. मागील चार दिवसांपासून येळ्ळूर, वडगाव शिवारात उच्च विद्युतभारीत वाहिन्या उभ्या करण्याचे काम सुरू केले आहे.
अल्पभूधारक शेतकरी यामुळे भूमिहीन होत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता वीजवाहिन्यांसाठी 10 ते 15 फुटांचे खड्डे करून त्यामध्ये काँक्रिट घातले जात आहे. यामुळे आजूबाजूच्या शेतीचेही नुकसान झाले आहे. किमान शेतकऱ्यांना याची पूर्वसूचना देणे गरजेचे होते. काही शेतकऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना न जुमानता काम सुरूच ठेवल्याने नाराजी व्यक्त होत आहे.









