छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा : महिला गटात रत्नागिरी, मुंबई उपनगरला पराभवाचा धक्का
प्रतिनिधी/ पुणे
23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरूष व महिला गट कबड्डी स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते. उद्घाटन प्रंसगी उपमुख्यंमंत्री अजित पवार यांनी खेळाडूंना व खेळासाठी सेवा व सुविधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी निधी कमी पडू देणार नाही, छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेसाठी एक कोटी रुपयांची तरतुद केली आहे. त्याच प्रमाणे बक्षिसांची रक्कमही 20 लाखाहून 45 लाख रुपये केली असल्याची घोषणा केली.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सायंकाळच्या सत्रात महिला विभागात ब गटात झालेल्या सामन्यात मुंबई शहर पश्चिम संघाने रत्नागिरी संघावर 22-17 अशी मात करीत आपल्या स्पर्धेतील पहिला विजय नोंदविला. मध्यंतराला मुंबई शहर पश्चिम संघाकडे 12-10 अशी आघाडी होती. मुंबई शहर पश्चिम संघाची कर्णधार सोनाली शिंगटे हिने आक्रमक खेळ करीत विजय मिळविला. तर पूजा यादव हिने सुरेख पकडी घेतल्या. रत्नागिरीच्या कर्णधार सिध्दी चाळके हिने जोरदार प्रतिकार केला. महिलांच्या अ गटात झालेल्या सामन्यात पुणे ग्रामिण संघाने मुंबई उपनगर पश्चिम संघावर 30-17 अशी मात करीत आपल्या गटात पहिला विजय नोंदविला.
पुरुषांत पुणे ग्रामीण, नंदुरबारचा शानदार विजय
पुरूषांच्या अ गटात पुणे ग्रामीण संघाने मुंबई शहर पूर्व संघावर 54-27 असा दणदणीत विजय मिळविला. पुरूषांच्या क गटात झालेल्या सामन्यात नंदुरबार संघाने मुंबई उपनगर पश्चिम संघावर 36-27 असा विजय मिळविला. मध्यंतराला नंदुरबार संघ 15-17 असा पिछाडीवर होता. नंदुरबारच्या ओंकार गाडे व जयेश महाजन यांनी मध्यंतरानंतर अधिक आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. दिपक शिंदे याने पकडी घेत चांगली साथ दिली. मुंबई उपनगर पश्चिमच्या रजत सिंग याने उत्कृष्ठ चढाया केल्या तर अक्षय तावडे याने काही चांगल्या पकडी घेतल्या.









