ड्रोनद्वारे होणार ये-जा, एआयद्वारे होणार काम
जगातील पहिले ‘भविष्याचे शहर’ टोयोटा या कंपनीने विकसित केले आहे. हे शहर आता स्वत:च्या रहिवाशांचे स्वागत करण्यासाठी तयार आहे. जपानमध्ये माउंट फुजीच्या परिसरात असलेल्या या शहराला ‘वोवेन सिटी’ नाव देण्यात आले आहे.
हे शहर हायड्रोजन ऊर्जा, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी सुसज्ज 11 स्मार्ट होम्सपासून सुरू होत आणखी विकसित होणार आहे. हे विकसित करण्याचा उद्देश भविष्यातील तंत्रज्ञानं आजमाविणे आणि त्यांना अधिक विकसित करण्यासाठी एक लॅबच्या स्वरुपात तयार करणे आहे.
या शहराची योजना 10 अब्ज डॉलर्सच्या खर्चाने साकारण्यात आली आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत पहिल्या 100 जणांना येथे वसविले जाणार आहे. हे सर्व टोयोटा कंपनीचे कर्मचारी असतील आणि त्यांना तेथे मोफत राहण्याची सुविधा मिळणार आहे, परतु ते कंपनीसाठी नव्या तंत्रज्ञानांच्या विकासावर काम करतील अशी अट असेल अशी माहिती टोयोटाचे सीईओ आकियो टोयोडा यांनी दिली आहे.
यानंतर पुढील टप्प्यात आणखी 2200 लोकांना तेथे आणले जाईल, ज्यात इनोव्हेटर्स, त्यांचे परिवार, आईवडिल आणि पाळीव प्राणी सामील असतील, त्यांना तेथे वसविण्यात येणार आहे.
शहरातील तंत्रज्ञान विकास
शहराला विकसित करण्याची घोषणा कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये करण्यात आली, जेथे काही योजनांचा खुलासा करण्यात आला. याच्या अंतर्गत रात्री घरापर्यंत सुरक्षित पोहोचविणारे ड्रोन, वृद्धांच्या सहाय्यासाठी इंटरअॅक्टिव्ह पेट रोबोट, दैनंदिन कामांमध्ये मदत करणारे रोबोट, ऑटो ड्रायव्हिंगचे नवे तंत्रज्ञान, फ्लाइंग सेल्फ-ड्रायव्हिंग रोबोट टॅक्सी आणि ऑटोनॉमस रेसिंग कार जी स्वत:हून ड्रिफ्ट करू शकेल, यासारख्या तंत्रज्ञानांना विकसित करण्यात येणार आहे.
वोवेन सिटी असेल एक लॅब
हे शहर केवळ राहणे, काम करणे आणि मनोरंजनाचे स्थान नसेल. हे एक लिव्हिंग लॅब असेल, जेथे रहिवासी स्वेच्छेने नव्या तंत्रज्ञानांचे परीक्षण करतील, येथे संशोधक आणि आविष्कारक सुरक्षित वातावरणात स्वत:च्या विचारांची पडताळणी आणि त्यांना व्यवहार्य स्वरुप देण्याची संधी मिळवू शकतील असे टोयोटाकडून सांगण्यात आले.
वोवेन सिटी नाव का?
हे शहर नव्या तंत्रज्ञानांना विकसित करण्याचे एक व्यासपीठ असेल, जे भविष्यात प्रत्येक घरात वापरले जाऊ शकते. या शहराचे नाव वोवेन सिटी टोयोटाच्या सुरुवातीच्या कहाणीवरून प्रेरित आहे. कंपनीने स्वत:ची सुरुवात एक लूम निर्माण कंपनी म्हणून केली होती. या शहराची निर्मिती जपानच्या सुसोनो सिटीनजीक एका जुन्या टोयोटा प्रकल्पाच्या ठिकाणी करण्यात आली आहे. वोवेन सिटी नफा कमावेल की नाही याची कल्पना नाही. परंतु हे शहर भविष्यातील तंत्रज्ञानांचे जन्मस्थळ असेल. या शहराची निर्मिती आता दुसऱ्या टप्प्यात दाखल झाली आहे. यात आणखी अधिक इमारतींची निर्मिती करत नव्या रहिवाशांना वसविण्यात येईल असे टोयोटाच्या सीईओंनी म्हटले आहे.
भविष्याला मिळणार नवी दिशा
2021 मध्ये पहिल्यांदा ‘वोवेन सिटी’च्या योजनेचा खुलासा करण्यात आला होता. वोवेन सिटी तंत्रज्ञानाच्या नवोन्मेषाचे केंद्र ठरण्यासोबत भविष्यातील स्मार्ट शहरं कशी असू शकतात याचे उदाहरण सादर करणार आहे.









