बेळगाव-धारवाडच्या भूसंपादनासाठी विलंब, बागलकोट-कुडची काम ठप्प : सावंतवाडी, कोल्हापूरसाठी प्रयत्न गरजेचे
बेळगाव : बेळगाव जिल्हा हा महाराष्ट्र-कर्नाटक व गोव्याच्या सीमेवर वसला असल्याने झपाट्याने विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. परंतु त्या मानाने रेल्वेसेवा उपलब्ध होत नसल्याची तक्रार उद्योजक-व्यापाऱ्यांनी वेळोवेळी केली आहे. जिल्ह्यातील सर्वच नवीन रेल्वेमार्गांच्या कामाला खीळ बसली आहे. बहुचर्चित बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर हा रेल्वेमार्ग भूसंपादनाअभावी पाच वर्षांपासून रखडला आहे. बेळगावचे माजी खासदार व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गाच्या कामाला मंजुरी मिळाली. मंजुरी मिळून पाच वर्षे उलटली तरी अद्याप भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
केंद्र सरकारने या 73 किलोमीटर रेल्वेमार्गासाठी 823 कोटी ऊपये मंजूर केले होते. परंतु भूसंपादन नसल्याने हा निधी अडकून पडला. सरकारी पातळीवर अनेकवेळा बैठका होऊनही अद्याप भूसंपादन पूर्ण झाले नसल्याने हा रेल्वे प्रकल्प रखडला आहे. नुकत्याच झालेल्या बेळगाव व धारवाड जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत जमीन संपादनाचे काम लवकर पूर्ण केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. बागलकोट-कुडची या 142 किलोमीटरच्या रेल्वेमार्गाला 2010 मध्ये रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली. यासाठी 986 कोटी ऊपये रकमेची तरतूद करण्यात आली. बागलकोट ते लोकापूरपर्यंतचे काम पूर्ण झाले असून मालवाहतूक सुरू करण्यात आली आहे. परंतु त्यापुढील रेल्वेमार्गाचे काम पूर्णत: ठप्प आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी सावंतवाडी, कोल्हापूर रेल्वेमार्ग आवश्यक
बेळगाव जिल्हा झपाट्याने विकसित होत असताना तितकीच चांगली वाहतूक व्यवस्था असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गाला समांतर बेळगाव-कोल्हापूर रेल्वेमार्ग करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. बेळगाव-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर बेळगाव-सावंतवाडी हा रेल्वेमार्ग व्हावा, यासाठी चंदगड, सावंतवाडी येथील नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्या मानाने बेळगावमधील लोकप्रतिनिधींकडून या रेल्वेमार्गासाठी प्रयत्न झालेले नाहीत.









