वृत्तसंस्था / लेह (लडाख)
येथे झालेल्या पुरुषांच्या आईस हॉकी लीग स्पर्धेचे जेतेपद विद्यमान विजेत्या कांग सिंग्सने स्वत:कडे पुन्हा राखले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात कांग सिंग्सने गेल्या वर्षीच्या या स्पर्धेतील उपविजेत्या चांगथांग शान्सचा पराभव केला. महिला विभागातील जेतेपद मेरीउल स्पामोने पटकाविले तर चांगला लामोस उपविजेता ठरला.
कांग सिंग्सने हा अंतिम सामना 5-2 अशा गोलफरकाने जिंकला. सिंग्सचा कर्णधार मुस्ताक अहम्मद आणि स्टेन झिन अँगचोक यांनी प्रत्येकी 2 गोल केले. लडाख आईस हॉकी संघटना आणि लडाख प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा दुसऱ्यांदा भरविण्यात आली होती. ही स्पर्धा 10 दिवस चालली होती आणि त्यामध्ये 30 सामने खेळविले गेले.
विजेत्या कांग सिंग्स संघाला चषक आणि अडीच लाख रुपयांचे बक्षीस तर उपविजेत्या चांगथांग शान्स संघाला चषक आणि दीड लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेत पुरुष विभागात कांग सिंग्सचा कर्णधार मुस्ताक अहमद गिरीची सर्वोत्तम हॉकीपटू म्हणून निवड करण्यात आली असून त्याला 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.









