पहिल्या टप्प्यात 33 ओलिसांची मुक्तता होणार : 15 दिवसांनी उर्वरितांची मुक्तता
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायल आणि हमास यांच्यात लवकरच युद्धविरामावरून करार पूर्ण होऊ शकतो. याकरता कतारची राजधानी दोहा येथे इजिप्त, कतार आणि अमेरिकेच्या मदतीने चर्चा सुरू आहे. कराराच्या पहिल्या टप्प्यात 33 ओलिसांची मुक्तता केली जाणार असल्याची माहिती इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हमासकडे 94 ज्यू ओलीस आहेत. हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलच्या 251 नागरिकांचे अपहरण केले होते. काही ओलिसांची मुक्तता यापूर्वीच करविण्यात आली आहे. तर काही ओलिसांचा संघर्षादरम्यान मृत्यू झाला आहे.
शस्त्रसंधीसाठी अखेरची चर्चा झाल्यावर यावर स्वाक्षरी होताच ती त्वरित लागू केली जाणार आहे. शस्त्रसंधीचा पहिला टप्पा 42 दिवसांचा असेल. 33 ओलिसांची मुक्तता केल्याच्या 15 दिवसांनी उर्वरित ओलिसांची मुक्तता करण्यात येणार आहे. यादरम्यान स्थायी स्वरुपात शस्त्रसंधी लागू करण्यावरही चर्चा होईल.
उत्तर गाझात परतणार पॅलेस्टिनी नागरिक
शस्त्रसंधीच्या अंतर्गत उत्तर गाझामधून विस्थापित झालेल्या पॅलेस्टिनी नागरिकांना इस्रायल परतण्याची अनुमती देणार आहे. परंतु या भागात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून इस्रायली सैनिकांची तैनात कायम राहू शकते. गाझा आणि इस्रायलदरम्यान बफर झोन तयार केला जाणार आहे. बफर झोनवरून इस्रायल आणि हमास दोघांच्याही वेगवेगळ्या मागण्या आहेत. इस्रायल सीमेपासून 2 किलोमीटरच्या बफर झोनची मागणी करत आहे. तर हमास ऑक्टोबर 2023 च्या पूर्वीप्रमाणेच 300 ते 500 मीटरचा बफर झोन इच्छित आहे. दुसरीकडे इस्रायलने कराराच्या अंतर्गत हमासचा प्रमुख याह्या सिनवारचा मृतदेह परत करण्यास नकार दिला आहे.
ओलिसांच्या कुटुंबीयांना भेटणार नेतान्याहू
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू हे हमासच्या कैदेत असलेल्या ओलिसांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. याचबरोबर शस्त्रसंधीला विरोध करणाऱ्या बेन ग्विर यांनाही भेटणार आहेत. शस्त्रसंधीच्या चर्चेत अमेरिकेचे आगामी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिनिधीलाही सामील करण्यात आले आहे. शस्त्रसंधी पुढे वाढविण्याची जबाबदारी ट्रम्प यांची असल्याने त्यांच्या प्रतिनिधीलाही सामील करण्यात आल्याचे अमेरिकेच्या विदेशमंत्र्यांनी म्हटले आहे. तर शस्त्रसंधी घडवून आणण्याच्या आम्ही समीप पोहोचलो आहोत. शस्त्रसंधीकरता हमासने तयारी दर्शविली नाही तर त्याला मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल असे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत.
इस्रायलच्या महिला सैनिकाचा व्हिडिओ
कतारमध्ये शस्त्रसंधीकरता सुरू असलेल्या चर्चेदरम्यान हमासने 4 जानेवारी रोजी 19 वर्षीय इस्रायली महिला सैनिक लिरी एलबागचा व्हिडिओ जारी केला होता. लिरीला हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी ताब्यात घेतले होते. या व्हिडिओत लिरीने हमासच्या कैदेतून इस्रायली नागरिकांची मुक्तता न करविल्याप्रकरणी पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांना जबाबदार धरले होते. लिरी एलबागचे 6 महिला सैनिकांसोबत नाहल ओज आर्मी बेसवरून अपहरण करण्यात आले होते. यातील 5 महिला सैनिक अद्याप हमासच्या कैदेत आहेत.









