नवी दिल्ली :
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मंगळवारी कालकाजी विधानसभा मतदारसंघासाठी स्वत:चा उमेदवारी अर्ज भरला आहे. आतिशी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप नेते प्रवेश वर्मा यांच्यावर आरोप केले आहेत. प्रवेश वर्मा उघडपणे पैसे वाटत असून निवडणूक आयोगाने निष्पक्ष निवडणूक करविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे आतिशी यांनी म्हटले आहे. आतिशी यांच्या विरोधात कालकाजी मतदारसंघात भाजपच्या वतीने माजी खासदार रमेश बिधुडी निवडणूक लढवत आहेत. तसेच काँग्रेसने या मतदारसंघात अलका लांबा यांना उमेदवारी दिली आहे. तर उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच आतिशी वादात सापडल्या आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे. प्रवेश वर्मा उघडपणे स्वत:च्या नावावर दिल्लीच्या लोकांना ब्लँकेट, पैसे, बूट्स आणि चप्पल वाटत आहेत. त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कुठलीच कारवाई केलेली नाही. आम्ही आयोगाकडे तक्रारही केली असल्याचे आतिशी यांनी म्हटले आहे. तर यंदाच्या निवडणुकीत कालकाजी मतदारसंघ अत्यंत हायप्रोफाइल ठरला आहे.









