सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत बेळगाव-सौंदत्ती मार्गावर बससेवा उपलब्ध
बेळगाव : प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेळगाव-सौंदत्ती मार्गावर सोडलेल्या विशेष बससेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सोमवारी पौर्णिमेदिवशी सौंदत्ती यल्लम्माला 60 हून अधिक बसेस धावल्या. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यल्लम्मा यात्रेसाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. यासाठी परिवहनने 3 ते 19 जानेवारीपर्यंत बेळगाव-सौंदत्ती मार्गावर विशेष बसची सोय केली आहे.
बेळगावसह खानापूर, चंदगड आणि ग्रामीण भागातूनही भाविक यल्लम्माच्या दिशेने रवाना होऊ लागले आहेत. त्यामुळे बेळगाव-सौंदत्ती विशेष बसला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. रविवारी 37 तर सोमवारी 60 हून अधिक बसेस यल्लम्मा डोंगराकडे धावल्या. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती डोंगरावर यात्रा भरते. यासाठी भाविक विविध भागातून यल्लम्माकडे जाऊ लागले आहेत. त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासून मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ वाढू लागली आहे.
गतवर्षी सौंदत्ती यल्लम्मा यात्रेतून परिवहनला 21 लाखांचा महसूल मिळाला होता. त्यामुळे यंदादेखील सौंदत्ती यात्रेतून अपेक्षित महसूल प्राप्त होईल, अशी आशा आहे. बेळगाव-सौंदत्ती 140 रुपये फुल्ल तर 70 रुपये हाफ तिकीट आहे. विशेषत: शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवास दिला जात आहे. यात्राकाळात प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत बेळगाव-सौंदत्ती मार्गावर बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे.









