शाकंभरी पौर्णिमेनिमित्त यल्लम्मा डोंगरावर भाविकांचा अथांग जनसागर
वार्ताहर /सौंदत्ती
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीचे दर्शन सोमवारी सुमारे पाच लाखाहून अधिक भाविकांनी घेतले. ‘उदो गं आई उदो’च्या जयघोषात ढोल-ताशांच्या गजरात व भंडाऱ्याची मुक्त उधळण करत यल्लम्मा डोंगर परिसर अक्षरश: गजबजला होता. सोमवारी शाकंभरी पौर्णिमेला सौंदत्ती डोंगरावर पाच लाखाहून अधिक भाविकांचा अथांग जनसागर लोटला होता. सोमवारी पहाटेपासूनच बस, कार, टमटम रिक्षा, टॅक्टर, मोटारसायकल वाहनांसह भाविक देवीच्या दर्शनाला निघाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. त्यामुळे डोंगर भाविकांनी फुलून गेला होता.
देवीच्या दर्शनासाठी दोन ते चार तास रांगेत उभे राहून पाच लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थान विकास प्राधिकरण नूतन कार्यदर्शी अशोक दुडगुंटी यांनी दिली. सोमवारी सायंकाळी मंदिरापासून मोकळ्या रस्त्यापर्यंत भाविकांनी काढलेल्या मिरवणुकीत ढोल-ताशांच्या तालात व अबीर भंडाऱ्याची उधळण करत डोंगर परिसर दणाणून सोडला. दोनच महिन्यांपूर्वी यल्लम्मा देवस्थान विकास प्राधिकरण स्थापन झाल्यापासून येथील स्थानिक आमदार डॉ. विश्वास वैद्य यांच्या नेतृत्वाखाली व प्राधिकरणच्या देखरेखीखाली झालेल्या पहिल्या यात्रेत भाविकांना पिण्याचे पाणी, निवास, स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या दोन दिवसात मोठ्या संख्येने भाविक डोंगरावर आल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला.
भाविकांची एकच गर्दी
बेळगाव, चंदगड, कोल्हापूर, सातारा, गोवा, आजरा, गडहिंग्लज, पुणे, धारवाड, विजापूर, गुलबर्गा व बेळगाव शहरासह तालुक्यातील विविध गावच्या भाविकांनी डोंगरावर एकच हजेरी लावल्याने डोंगर फुलून गेला होता. बेळगाव जिल्ह्यातील भाविकही सायकल व दुचाकी वाहने टेम्पो आदींचा आधार घेत डोंगरावर आल्याने सुमारे दोन कि. मी. पर्यंत गर्दी होती. शुक्रवारी पहाटे हिरेमठ स्वामीजींच्या हस्ते देवीची पूजा झाल्यानंतर देवीच्या दर्शनाचा मार्ग मोकळा झाला. यात्रेनिमित्त डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जोगुळभावी पुंडात स्नानासाठी एकच गर्दी झाली होती.
पडल्या भरणे उत्साहात
शाकंभरी पौर्णिमेदिवशी पडल्या भरण्याचा धार्मिक कार्यक्रम असतो. या दिवशी कडबाच्या पोळ्या, पुरण पोळ्या, वांग्याची भाजी, भात, तूप या पदार्थांचा नैवेद्य भाविक देवीला समर्पित करण्याची प्रथा आहे. तसेच भाविकांची श्रद्धा असल्याने हे सर्व पदार्थ व्यापाऱ्यांनी तयार करून त्यांची विक्री करण्यात आली होती.
पाण्यासाठी भाविकांची डोंगरावर झुंबड….
शाकंभरी पौर्णिमेच्या यात्रेदिवशी सर्वच यात्रेकरूंना भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली. रांगेत उभे राहूनही पाणी मिळत नसल्याचे पाहून मिळेल तेथून पाणी मिळविण्यासाठी डोंगरावर भाविक धावाधाव करत होते. पाणी मिळविण्यासाठी भाविक धडपड करत असल्याचे चित्र डोंगरावर दिसत होते. तहान भागविण्यासाठी नव्याने टँकर मागवून पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
वाहतूक विस्कळीत
डोंगरावर सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास हुबळी-धारवाडमार्गे, बागलकोट-सौंदत्तीमार्गे, सुतगिरणीच्या रस्त्यावर व बेळगाव-सौंदत्तीमार्गे आदी विविध भागांतून आलेल्या राज्य परिवहनच्या बसेस मिळेल त्या ठिकाणी उभ्या केल्याने डोंगरावर वाहतूक विस्कळीत झाली होती. डोंगरावर संपर्कात असलेल्या उगरगोळ सौंदत्ती मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या बसेस थांबविण्यात आल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची मोठी कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना फिरणेही मुष्कील झाले होते. यावेळी ठिकठिकाणी पोलीस व वाहनचालकांमध्ये शाब्दिक चकमकी उडत होत्या.









