नववर्षातील पहिला सण साजरा करण्यासाठी खरेदीला ऊत : भोगीच्या पार्श्वभूमीवर साहित्याला मागणी
बेळगाव : भोगी आणि मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. विशेषत: तिळगूळ, भाकऱ्या, चटण्या आणि भाजीपाला खरेदी झाला. त्याचबरोबर सोले, वांगी, वाटाणा, लालभाजी, कांदापात आदी भाज्यांना पसंती मिळाली. मंगळवारी मकरसंक्रांतीचा सण असल्याने तिळगूळ खरेदीवर अधिक भर देण्यात आला. बाजारात तिळगुळाचे लाडू, विविध प्रकारच्या भाकऱ्या, सोले यांना मागणी वाढली होती. त्याचबरोबर विविध चौकांमध्ये त्यांची विक्रीही करण्यात आली. नवीन वर्षातील पहिला सण उत्साहात साजरा करण्यासाठी खरेदीला ऊत आला होता. यंदा तिळगुळाच्या दरात काहीशी वाढ झाली असून 60 रुपये किलो दराने तिळगूळ विक्री होऊ लागला आहे. गतवर्षी 45 ते 50 रुपये असणारा तिळगूळ यंदा 60 रुपये किलो झाला आहे.
विविध भाज्यांनाही मागणी वाढू लागली आहे. काकडी, गाजर, कांदापात, लालभाजी, वांगी आदी भाज्यांचीही किरकोळ बाजारात खरेदी झाली. गणपत गल्ली, समादेवी गल्ली, मारुती गल्ली, नरगुंदकर भावे चौक, काकतीवेस आदी ठिकाणी तिळगुळाची विक्री करण्यात आली. किरकोळ विक्रेत्यांकडून 20 रुपये पाकीट याप्रमाणे विक्री सुरू होती. महिलावर्गाकडून वाण म्हणून देण्यात येणाऱ्या सुगडींचीही खरेदी झाली. भोगीच्या पार्श्वभूमीवर रविवारी बाजारात विविध भाज्या आणि इतर साहित्याला मागणी वाढली होती. तिळगूळ आणि इतर साहित्याची खरेदी महिलावर्गाकडून झाली.
आज मकरसंक्रांत
मंगळवारी शहरासह ग्रामीण भागातील मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. सोमवारी सोशल मीडियावर भोगीच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. परंपरा जपत एकमेकांना मकरसंक्रांतीचे तिळगूळ देऊन सण साजरा केला जाणार आहे.









