बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमी आयोजित साईराज चषक 13 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत सामेवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून बेळगाव स्पोर्ट्स क्लबने मलतवाडकर अकादमीचा 165 धावांनी तर नीना स्पोर्ट्सने प्रमोद पालेकर अकादमीचा 111 धावांनी पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. आयुष आजगावकर, अजय लमाणी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. व्हॅक्सिनडेपो मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 5 गडी बाद 224 धावा केल्या. त्यात आयुष आजगावकरने 7 चौकारांसह 50, समर्थ तलवारने 5 चौकारांसह 34, दर्श रायकरने 3 चौकारांसह 29 तर अलत्मश सनदीने 4 चौकारांसह 26 धावा केल्या. मलतवाड अकादमीतर्फे अरुश व विश्वजित यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मलतवाडकर अकादमीचा डाव 16 षटकात सर्वगडी बाद 59 धावांत आटोपला. त्यात एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे दिगंत वालीने 10 धावांत 4, सोहम के. व कनिष्क यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात नीना अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 4 गडी बाद 228 धावा केल्या. त्यात अजय लमाणीने 6 षटकार 16 चौकारांसह 73 चेंडूत 132 धावा करुन दमदार शतक झळकविले. त्याला अमर पठाणने 4 चौकारांसह 46 धावा करुन सुरेख साथ दिली. पालेकरतर्फे हर्षित, संजय, पियुश, सोहन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तराखल खेळताना प्रमोद पालेकर अकादमीने 25 षटकात 6 गडी बाद 121 धावा जमविल्या. त्यात संजय सामजीने 17, पियुश शेटने 20 तर फरान नदाफने 11 धावा केल्या. नीनातर्फे अरमान शहापूरकर याने 19 धावांत 2 तर अरजान व अमर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.









