वृत्तसंस्था / आलूर
19 वर्षांखालील वयोगटाच्या येथे सुरू असलेल्या महिलांच्या वनडे क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात मुंबई संघाचे प्रतिनिधीत्व करणारी 14 वर्षीय इरा जाधव मेघालय विरुद्ध वैयक्तिक 346 धावांचा नवा विक्रम केला.
14 वर्षीय इरा जाधव ही मुंबईच्या शारदाश्रम विद्या मंदिरची विद्यार्थिनी आहे. याच हायस्कूलने सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि अजित आगरकर हे क्रिकेटपटू भारताला दिले आहेत. मेघालय विरुद्धच्या सामन्यात खेळताना इरा जाधवने 157 चेंडूत 16 षटकार आणि 42 चौकारांसह 346 धावा झोडपल्या. युवा लिस्ट ए क्रिकेट स्पर्धेतील इरा जाधवचा हा भारतीय विक्रम म्हणावा लागेल. लिस्ट ए क्रिकेटमध्ये 2010 साली द. आफ्रिकेच्या लिझेली लीने 427 धावांचा विश्वविक्रम केला असून तो अद्याप अबाधित आहे.
गेल्यावर्षी झालेल्या महिलांच्या पहिल्याच प्रिमीयर लीग टी-20 स्पर्धेच्या लिलावामध्ये इरा जाधवला कोणीही खरेदी केले नव्हते. पण मलेशियामध्ये होणाऱ्या आगामी 19 वर्षाखालील वयोगटाच्या टी-20 विश्वचषक महिलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी इरा जाधवची राखीव खेळाडू म्हणून निवड केली आहे. भारतीय महिला संघातील जेमिमा रॉड्रिग्ज ही इरा जाधवची चाहती आहे. इरा जाधवने मेघालय विरुद्धच्या सामन्यात त्रिशतक झळकविले तसेच कर्णधार हुर्ले गाला समवेत दुसऱ्या गड्यासाठी 274 धावांची भागिदारी केली. या सामन्यात मुंबईने मेघालयावर 544 धावांच्या फरकाने मोठा विजय मिळविला. मुंबईने 50 षटकात 3 बाद 563 धावा जमविल्यानंतर मेघालयाचा डाव केवळ 19 धावांत आटोपला.









