वृत्तसंस्था/ तिरुपती
आंध्रप्रदेशातील तिरुपती तिरुमला देवस्थानम मंदिरातील लाडू वितरण केंद्राजवळ सोमवारी आग लागली. काउंटरजवळ मोठी गर्दी असताना ही दुर्घटना निदर्शनास आल्याने भाविकांची धावपळ उडाली. आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. ही घटना 10 दिवसांच्या वैकुंठद्वार दर्शनम उत्सवादरम्यान घडली. तिरुपती मंदिरात देशभरातून हजारो लोक येथे पोहोचत असतात. गेल्या आठवड्यातच तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीची घटना घडली होती. त्यापाठोपाठ आता आगीची दुर्घटना घडल्याने भाविकांमध्ये वेगवेगळी चर्चा सुरू आहे. पाच दिवसांपूर्वीच वैकुंठद्वार दर्शनाची टोकन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली असताना चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या दुर्घटनेत सहा भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 40 हून अधिक जण जखमी झाले होते.









