160 कोटी वर्षांपूर्वी येथून जायचा कळप
डायनासोर्सचे जग नेहमीच माणसांसाठी रोमांचकारी राहिले असून त्यांच्याविषयी नवे जाणून घेण्याचा प्रयत्न जगभरात होत राहिला आहे. याच क्रमात विशाल आकाराच्या जीवांवरून ब्रिटनमधून नवी माहिती समोर आली आहे. संशोधकांनी ऑक्सफोर्डशायरच्या खाणींमधून शेकडो डायनासोर फुटप्रिंट शोधून काढले असून ते सुमारे 166 कोटी वर्षांपासून जमिनीत दबलेल्या अवस्थेत होते. या शोधामुळे डायनासोर्सविषयी नवी माहिती समोर येईल असे वैज्ञानिकांचे मानणे आहे.
इंग्लंडच्या क्वॉरी येथील खाणींमधुन ऑक्सफोर्ड अन् बर्मिंगघम युनिव्हर्सिटीच्या तज्ञांनी डायनासोरच्या पाऊलखुणा शोधल्या आहेत. टीमकडून अशा 5 मार्गांचा शोध लावण्यात आला आहे, जेथे कधी डायनासोर्सचा वावर होता आणि याच मार्गाला आता ‘डायनासोर हायवे’ म्हटले जातेय. या संशोधनात 4 ट्रॅकवर शाकाहारी सॉरोपॉड डायनासोर चालत होते असे समोर आले. तसेच या भागात सर्वात लांब ट्रॅक सुमारे 150 मीटरचा मिळाला आहे.
खाणींच्या मातीखाली पाचवा ट्रॅक मांसाहारी डायनासोर्स मेगालोसॉरसचा असून त्याच्या ठश्यात तीन पंजे सामील आहेत. हा फूटप्रिंट सुमारे 166 कोटी वर्षापूर्वीचा असल्याचे संशोधकांचे सांगणे आहे. तसेच मांसाहारी आणि शाकाहारी डायनासोर्सचे ट्रॅक परस्परांना क्रॉस करतानाही आढळून आले आहेत. यामुळे ते परस्परांना भेटत होते का परस्परांमध्ये त्यांचे वर्तन कसे होते असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शोधाची सुरुवात कशी?
सर्वप्रथम खाणींच्या भागात काम करणाऱ्या लोकांना जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारचे उंचवटे दिसून आले आणि यानंतर वैज्ञानिकांच्या टीमला येथे बोलाविण्यात आले. मग दोन्ही विद्यापीठांच्या 100 हून अधिक सदस्यांच्या टीमने एक आठवड्यापर्यंत या भागात उत्खनन केले, अशाप्रकारे हळूहळू डायनासोर्सचे सुमारे 200 फूटप्रिंट शोधून काढण्यात आले. याचबरोबर संशोधनाच्या उद्देशाने या फूटप्रिंटची 2 हजारांहून अधिक छायाचित्रे काढण्यात आली असून चित्रिकरणही करण्यात आले आहे. याच भागात 1997 मध्ये सुमारे 40 फूटप्रिंट मिळाले होते आणि तेव्हा 180 मीटर लांब ट्रॅक शोधण्यात आला होता, परंतु तेव्हा तंत्रज्ञान फारसे प्रगत नसल्याने सखोल संशोधन होऊ शकले नव्हते.
वैज्ञानिकांचा शोध महत्त्वपूर्ण
डायनासोर हायवे आणि या फूटप्रिंटद्वारे पृथ्वीवर राहिलेल्या या विशाल आकाराच्या जीवांविषयी महत्त्वाची माहिती मिळविता येणार आहे. याद्वारे डायनासोर कसे चालत होते, ती किती वेगाने धावू शकत होते, त्यांचा आकार किती मोठा होता आणि त्यांच्यात परस्परांदरम्यान कशाप्रकारचे वागणे होते या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची अपेक्षा आहे.









