कोल्हापुरला निसर्गाचे वरदान असलेली टेकडी.
केवळ धार्मिक नव्हे टेकडीला शौर्याचा इतिहास.
कोल्हापूरः सुधाकर काशीद
टेकडी म्हणजे त्यावर भुरभुरणारी माती. मुरलेले खडक. लवलवणारे गवत आणि ऊन, वारा, पाऊस झेलत ताठ मानेने उभा असलेला छोटा डोंगर. त्यावर हिरवाईची झूल चढली की टेकडीचे रूप तर काही औरच. पण ही टेकडी सिमेंटची झाली तर? ही कल्पनाच कोणालाही नजर सहन न होणारी आहे. पण कोल्हापूरच्या टेंबलाबाईची टेकडी सिमेंट काँक्रीटच्या व दगडी फरशीच्या आवरणाखाली दडली जात आहे. टेकडीचा सर्वात उंच भाग आता सिमेंटने झाकलाही गेला आहे. उरलेले रस्तेही सिमेंटचे होत आहेत. अगदी सर्वांच्या देखत बिनधास्त हे होत आहे. सारे कोल्हापूरकर मात्र शांत शांत आहेत. याच सिमेंटवर पुढे फरशा घातल्या जाणार आहेत.
सुशोभीकरण म्हणजे सिमेंटचे जंगल, पेव्हींग ब्लॉक आणि खांबांची रांग असे कोल्हापुरात समीकरण झाले आहे. निधी आला आहे तर तो खर्च करायचाच म्हणून हे असले आराखडे तयार केले गेले आहेत. आराखडा तयार करणाऱ्याला कदाचित ते टेंबलाबाई टेकडीचा इतिहास, भूगोल माहीत नसेल. पण अगदी उघडपणे टेकडीचे मूळ रूप उद्ध्वस्त करणाऱ्यांकडे का पाहिले जात नाही, हा खूप गंभीर प्रश्न आहे. टेकडी हेरिटेजच्या यादीत आहे. पण कोणाचीही मान्यता न घेता आला निधी तर खर्च करा, अशा पद्धतीने काम सुरू झाले आहे.
कोल्हापूरची टेंबलाबाईची टेकडी म्हणजे कोल्हापूरला मिळालेली निसर्गाची देणगी आहे. शहरालगत असलेल्या या तीन टेकड्यांना धार्मिक इतिहास आहे. शौर्याची परंपरा आहे. पर्यावरणाची किनार आहे. पण कशाचीही दखल न घेता टेकडीच्या टोकावर सिमेंट काँक्रीटचा व दगडी फरशीचा पूर्ण थर टाकला जाणार आहे. धार्मिक ग्रंथात टेंबलाबाई ही अंबाबाईची बहीण आहे. तिला भेटण्यासाठी अंबाबाई दरवर्षी नवरात्रात पालखीतून येते, तेथे मोठा सोहळा होतो. कोल्हापूरची सर्वात मोठी यात्रा भरते, हा झाला धार्मिक इतिहास.
पण या टेकडीला शौर्याची परंपरा आहे. राजाराम रायफल्स या संस्थानकालीन सशस्त्र दलाचे या टेकडीवर मुख्यालय होते. याच राजाराम रायफल्सचे पुढे मराठा लाईफ इन्फंट्रीत रूपांतर झाले. आजही या टेकडीवर बटालियन आहे. याशिवाय पूर्वी जे संसर्गजन्य आजार व्हायचे, त्यावेळी रुग्णांना संसर्गविरहित जागी ठेवण्यासाठी या ठिकाणी खास बरॅक होत्या. क्लाऊड हिल असेही या टेकडीला म्हटले जायचे. अलीकडचा उल्लेख म्हणजे टेकडीच्या पायथ्याला विक्रमनगर आहे. हे नाव कोल्हापूरचे शहाजी महाराज यांचे. ते देवास येथूनन कोल्हापूरला दत्तक आले. त्यांचे तिकडचे नाव विक्रमसिंह पवार. यांच्या दत्तक विधानावेळी या परिसराला विक्रमनगर नाव देण्यात आले आणि शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी या टेकडीवर पाण्याची मोठी टाकी उभारण्यात आली . आजही ही पाण्याची टाकी तेथे आहे.
यापेक्षाही विशेष म्हणजे तेथील टी.ए. बटालियनच्या जवानांची जेव्हा सीमेवर रवानगी होते, त्यावेळी जवानांचा ताफा जाताना रेल्वेच्या एका बोगीत टेंबलाबाईचा प्रतीकात्मक गाभारा उभारलेला असतो व तो सोबत सीमेवरच्या छावणीत जातो.
या टेकडीवरून दिसणारा सूर्योदय तर अवर्णनीय. या टेकडीवर 12 तास वाऱ्याची झुळूक वाहते. या टेकडीवर ब्रिटिशांनी बँड स्टॅंड बांधले होते . त्यात बँडवादन होत होते, अशा वैविध्याने ही टेकडी समृद्ध आहे. गेली कित्येक वर्ष भंगार अवस्था टेकडीच्या वाट्याला आली होती. आता तिचे सुशोभीकरण सुरू आहे. पण टेकडीच्या वरच्या भागात पूर्ण सिमेंट काँक्रीट ओतले आहे. त्यावर आता फरश्या बसवल्या जाणार आहेत. टेकडी या क्षणी जणू सिमेंटची झाली आहे. वास्तविक टेकडी हिरवीगार होण्याची गरज आहे. पण सुशोभीकरणाचा ढाचा अशा सिमेंट आणि फरशीत तयार केला गेला आहे.
जत्रेसाठी दगडी फरशा.
टेकडीवर ज्या भागात टेंबलाबाईची जत्रा असते, त्या भागात दगडी फरशा बसवण्यासाठी आता सिमेंटचा थर टाकण्यात आला आहे. हे काम पूर्वीच मंजूर झालेले आहे आणि आता सुरू झाले आहे.
– शिवराज नाईकवडे
सचिव, प. म. देवस्थान समिती
टेकडी नैसर्गिकच पाहिजे.
टेकडी ही टेकडीच राहिली पाहिजे. कारण टेकडी हे नैसर्गिक स्थान आहे. ते हेरिटेजच्या यादीत आहे. पण हेरिटेजची मान्यता घेतलेली नाही. टेकडी मूळ स्थितीत आली पाहिजे.
– उदय गायकवाड, रामेश्वर पत्की, हेमंत आराध्ये,
राज्य पर्यावरण समिती सदस्य








