रोटरी इंटरनॅशनलचे संचालक टी. एन. सुब्रह्मण्यम यांची माहिती
बेळगाव : रोटरी ही संस्था जगभरात सेवाभावी संस्था म्हणून ओळखली जाते. त्यातही देशातील रोटरी क्लबचे एक वेगळे सामाजिक योगदान आहे. रोटरीचे देशातील सामाजिक काम पाहता जगात सर्वाधिक काम हे भारतामध्ये सुरू आहे. त्यामुळे भारतीय रोटरी क्लबचा जगात पहिला क्रमांक लागतो, अशी माहिती रोटरी इंटरनॅशनलचे संचालक टी. एन. सुब्रह्मण्यम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. टी. एन. सुब्रह्मण्यम हे रोटरी अन्नोत्सवानिमित्त बेळगावात आले होते. रविवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत रोटरीच्या कार्याची माहिती दिली. देशातील नामवंत उद्योजक रोटरीशी सलग्न आहेत.
बिल गेट्स यासारख्या व्यक्ती रोटरीला भरभरून आर्थिक मदत देत आहेत. याठिकाणी सर्व व्यवहार चोख असल्यामुळे भ्रष्टाचाराचा संबंधच येत नाही. त्यामुळे रोटरी क्लबवरचा विश्वास दिवसेंदिवस वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘पोलिओमुक्त जग’ हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर आता विभागवार उपक्रम सुरू आहेत. देशात 1 लाख 75 हजार रोटरीचे सदस्य आहेत. तर 500 हून अधिक क्लब आहेत. या क्लबमधून झाडांचे रक्षण, खारफुटीचे रक्षण, पाण्याचा वापर, विजेची बचत असे उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, अशोक नाईक, मनोज हुईलगोळ यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शहरात लवकरच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
रोटरी क्लब ऑफ बेळगावच्यावतीने शहर तसेच तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. स्मार्ट क्लास रुम, स्वच्छतागृह, या प्रकल्पांसोबत आता शहरात तीन ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जात आहेत. यापैकी दोन प्रकल्प कॅम्प परिसरात असून त्यांचे उद्घाटन लवकरच होणार आहे. जय भारत फौंडेशनच्या सहकार्याने हे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केले जात असल्याचे रोटरीचे प्रांतपाल शरद पै यांनी सांगितले.









