विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल : जीवघेणा प्रवास सुरूच : बसेसचा तुटवडा
बेळगाव : परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता असल्याने दैनंदिन बसप्रवास दिवसेंदिवस अधिकच धोकादायक बनू लागला आहे. विविध मार्गांवर विद्यार्थ्यांना जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. शक्ती योजनेमुळे बसफेऱ्या कमी झाल्याने सार्वजनिक बस व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. दररोज शालेय दरवाजात लोंबकळतच प्रवास करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. त्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि परिवहन याकडे लक्ष देणार का? असाच प्रश्न सर्वसामान्य पालक आणि विद्यार्थ्यांना पडू लागला आहे.
शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे विविध मार्गांवर बसेसचा तुटवडा जाणवू लागला आहे. दरम्यान मिळेल त्या बसने विद्यार्थ्यांना चेंगराचेंगरी करत प्रवास करावा लागत आहे. यामध्ये विद्यार्थिनींची मोठी हेळसांड होऊ लागली आहे. रात्री घरी पोहोचायला उशीर होऊ लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिवहनच्या बसेस यात्रा, जत्रा आणि सहलींसाठी धावत आहेत. त्यामुळे विविध मार्गांवर बसेसचा तुटवडा दिसत आहे.
शक्ती योजनेचा परिणाम
शक्ती योजनेमुळे महिलांचा प्रवास वाढला आहे. परिवहनच्या बसलाच अधिक प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे बसमध्ये विद्यार्थ्यांना जागा मिळणे अशक्य होऊ लागले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना बसच्या दरवाजात लोंबकळत गाव गाठावे लागत आहे. काही मार्गावर विद्यार्थी बसमधून पडून जखमी होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. तर काही ठिकाणी जीवघेणे अपघातही घडू लागले आहेत.
विद्याथ्यर्च्यां अडचणीत वाढ
विद्यार्थ्यांनी परिवहनला आगाऊ रक्कम देऊन बसपास काढले आहेत. मात्र विद्यार्थ्यांना सुरळीत बससेवा मिळत नसल्याने अडचणी वाढू लागल्या आहेत. वर्षभरापूर्वीच बसपासच्या माध्यमातून आगाऊ रक्कम देऊन देखील विद्यार्थ्यांना बस उपलब्ध होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. मिळेल त्या बसने जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे.









