शाकंभरी पौर्णिमेसाठी अतिरिक्त बस : भक्तांचा प्रतिसाद
बेळगाव : भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी बेळगाव-सौंदत्ती मार्गावर सोडण्यात आलेल्या विशेष बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: रविवारपासून भक्त प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर शाकंभरी पौर्णिमेनिमित्त भक्तांची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बस स्थानकातून गुरुवारपासून बेळगाव-सौंदत्ती मार्गावर अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या आहेत. सोमवारी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर यात्रा भरणार आहे. यासाठी बेळगाव, खानापूर, चंदगड आणि इतर भागांतून लाखो भाविक डोंगरावर दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बस स्थानकातून पहाटे 5 ते रात्री 10 पर्यंत विशेष बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. बेळगाव-सौंदत्तीसाठी 140 रुपये फुल्ल तर 70 रुपये हाफ तिकिटाचा दर आहे. विशेषत: शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवास दिला जाणार आहे. मात्र, पुरुषांना तिकीट काढावे लागणार आहे. सौंदत्ती यल्लम्मा शाकंभरी पौर्णिमेसाठी परिवहनने 50 बसेस उपलब्ध केल्या आहेत. प्रवाशांच्या संख्येनुसार बेळगाव-सौंदत्ती मार्गावर या विशेष बसेस धावणार आहेत. गतवर्षी सौंदत्ती यात्रेतून परिवहनला 21 लाखांचा महसूल मिळाला होता. त्यामुळे यंदादेखील या यात्रेतून अतिरिक्त महसूल प्राप्त होण्याची अपेक्षा परिवहनला आहे.









