वृत्तसंस्था/ ढाका
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी शकिब अल हसनला गोलंदाजीच्या शैलीविषयीच्या दुसऱ्या चाचणीत अपयशी ठरल्याने आणखी एक धक्का बसला आहे. यामुळे त्याला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करता येणार नाही.
शकिब यापूर्वी ब्रिटनमधील आयसीसी मान्यताप्राप्त चाचणी केंद्र असलेल्या लॉफबरो विद्यापीठात त्याच्या गोलंदाजीच्या शैलीचे स्वतंत्र मूल्यांकन करण्यात आले असता त्यात अपयशी ठरला होता. 15 डिसेंबर, 2024 रोजी जाहीर झालेल्या सदर निकालामुळे त्याला क्रिकेटच्या कोणत्याही स्वरूपात डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी टाकता आली नाही. गेल्या महिन्यात चेन्नईतील श्री रामचंद्र सेंटर फॉर स्पोर्ट्स सायन्स येथे या अष्टपैलू खेळाडूची फेरतपासणी करण्यात आली, परंतु निकाल त्याच्या स्थितीत कोणताही बदल आणणारा ठरला नाही.
परिणामी ब्रिटननधील लॉफबरो विद्यापीठाच्या चाचणी केंद्रातील सुऊवातीच्या स्वतंत्र मूल्यांकनानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्याच्या बाबतीत त्याच्यावर घातलेले निलंबन कायम राहील, असे बीसीबीने एका निवेदनात म्हटले आहे. सदर बंदी उठविण्यासाठी पुनर्मूल्यांकन होऊन त्यात शकिब यशस्वी ठरणे आवश्यक आहे. बांगलादेश 20 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये भारताविऊद्धच्या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेची सुऊवात करेल.









