आणखी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा : शस्त्रसाठाही जप्त
वृत्तसंस्था/ नारायणपूर, बिजापूर
छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या नक्षलवादविरोधी मोहिमेला वेग आला असून कारवाईचे सत्र सुरूच आहे. रविवारी झालेल्या चकमकीत डीव्हीसीएम स्तरावरील नक्षलवादी ठार झाले. बिजापूर जिह्यात सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आणखी तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. नक्षलवाद्यांकडून स्वयंचलित शस्त्रsही जप्त करण्यात आली आहेत.
छत्तीसगडमधील भोपाळपट्टणमच्या मद्दीद परिसरातील बांदेपारा, कोरंजेडच्या जंगलात सकाळपासून अधूनमधून गोळीबार सुरू आहे. नारायणपूर जिह्यातून नक्षलवादी साहित्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. शोधमोहिमेमध्ये डीआरजी टीमने अबुझहमाडमधील हिरगेनार-गुमचूरच्या जंगलातून ते जप्त केले. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये बीजीएल, बाण, बॉम्ब, देशी बनवलेले ग्रेनेड, कुकर आणि टिफिन बॉम्ब बनवण्याचे साहित्य समाविष्ट आहे. नारायणपूरचे पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी याची पुष्टी केली आहे. हे प्रकरण सोनपूर पोलीस स्थानक परिसरातील आहे.
छत्तीसगडमधील बिजापूर जिह्यात सकाळपासून अधूनमधून गोळीबार सुरू होता. या चकमकीत जवानांनी 3 नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. चकमकीत डीव्हीसीएम स्तरावरील नक्षलवादी मारले गेल्याचे पोलीस सूत्रांकडून जाहीर करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांच्या वास्तव्याची माहिती मिळाल्यानंतर सैनिक कारवाईसाठी निघाले होते. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरूच होती.









