वृत्तसंस्था / लॉस एंजल्स
अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात भडकलेल्या वणव्यावर पाचव्या दिवशीही नियंत्रण मिळविण्यात तेथील प्रशासनाला अपयश आले आहे. या भीषण वणव्यात आतापर्यंत 11 नागरीकांचा बळी गेला असून एकंदर 150 अब्ज डॉलर्सची आर्थिक हानी अमेरिकेला सोसावी लागेल, असे अनुमान व्यक्त करण्यात आले.
मंगळवारी कॅलिफोर्निया प्रांतामधील वनप्रदेशात आग भडकली होती. ती पाहता पाहता जवळपास 40 हजार एकर प्रदेशात पसरली आहे. या वणव्यात 10 हजारांहून अधिक घरे जळून गेल्याने तीन ते चार लाख लोकांवर बेघर होण्याची वेळ आली असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सलग पाच दिवस वणवा भडकला असून आतापर्यंत तो विझवण्याच्या कामी कोट्यावधी डॉलर्स खर्च झाल्याची माहिती देण्यात आली . आगीसमवेत प्रचंड प्रमाणात लूट झाल्याने वणवाग्रस्त भागात गृहरक्षक दलाची नियुक्ती प्रशासनाला करावी लागली आहे.
हॉलिवुड नायकांची घरे भस्मसात
या वणव्याचा मोठा फटका हॉलिवुडच्या नायकांना बसला आहे. पेरिस हिल्टन, टॉम हॅक्स, स्टीव्हन स्लीपबर्ग यांच्यासारख्या स्टार्सची घरे जळून खाक झाली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी आपला इटली दौरा या वणव्यामुळे रद्द केला आहे. तो त्यांच्या अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने शेवटचा विदेश दौरा ठरणार होता. डोनाल्ड ट्रंप यांनी या भीषण दुर्घटनेसाठी मावळते राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांना उत्तरदायी मानले आहे. जाता जाता त्यांनी माझ्यासाठी हे सोडले आहे, अशी उपहासगर्भ प्रतिक्रिया त्यांनी दोन दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.
30 हजार घरे हानीग्रस्त
पूर्णत: जळून गेलेल्या 10 हजार घरांसह आणखी 30 हजारांहून अधिक घरांची हानी झाली आहे. या हानीची अद्याप गणना करण्यात आलेली नाही. वणवा आटोक्यात आल्याशिवाय हानीचे प्रमाण निर्धारित करता येणार नाही, असे प्रतिपादन कॅलिफोर्निया प्रांताच्या प्रशासनाने केले. अमेरिकेच्या गेल्या 50 वर्षांच्या इतिहासात अशी नैसर्गिक आपत्ती आली नव्हती, अशी प्रतिक्रिया येत आहे.









