महापालिका कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न, पथदीपांचीही तोडफोड
बेळगाव : अनगोळ येथील धर्मवीर संभाजी महाराज पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या वादात आता कन्नड संघटनेनेही उडी घेतली आहे. महापौर-उपमहापौरांसह लोकप्रतिनिधींवर कारवाई करून महापालिका बरखास्त करावी, या मागणीसाठी गुरुवार दि. 9 रोजी महापालिकेवर कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. यावेळी चन्नम्मा सर्कल ते महापालिका दरम्यानच्या रस्त्यावर हायड्रामा करत पथदीपांची तोडफोड करण्यासह महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. संभाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्यावरून महिनाभरापासून शहरात तणावाचे वातावरण आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यापूर्वी पार पडलेला लोकार्पण सोहळा अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच महापालिकेच्यावतीने लवकरच शिष्टाचाराप्रमाणे पुतळ्याचे अनावरण केले जाईल, असे सांगितले आहे. दोन गटात अंतर्गत धुसफूस सुरू असतानाच आता या वादात कन्नड संघटनेनेही उडी टाकली आहे. महापौर आणि उपमहापौर यांच्यावर कारवाई करण्यासह महापालिका बरखास्त करावी, या मागणीसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चन्नम्मा सर्कल येथून आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेड्स लावले. मात्र, मोर्चा कुमार गंधर्व रंगमंदिर येथे आला असताना काही अतिउत्साही कानडी कार्यकर्त्यांनी आगळीक करत स्मार्ट सिटीच्या पथदीपांची तोडफोड केली. पण पोलिसांना त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे जमले नाही. इतकेच नव्हे तर महापालिकेच्या संरक्षक भिंतीवरून उडी घेत काहीजणांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस व कार्यकर्त्यांची पळापळ झाली. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.









