मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा अधिकाऱ्यांना आदेश : अन्न-नागरी पुरवठा खात्याच्या प्रगती आढावा बैठकीत विविध सूचना
बेंगळूर : केंद्र सरकारने ठरविलेल्या निकषांची पुर्तता न करणाऱ्या कुटुंबांची बीपीएल रेशनकार्डे टप्प्याटप्प्याने रद्द करावीत. मात्र, पात्रता असणाऱ्या एकाही व्यक्तीचे बीपीएल कार्ड रद्द करू नये. अपात्र बीपीएल कार्डधारकांना त्यांचे कार्ड स्वेच्छेने परत करण्यासाठी कालावधी द्यावा. त्यानंतर संबंधितांना नोटीस बजावून कार्डे रद्द करण्याची कारवाई करावी, असा आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना दिला.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी गृहकार्यालय ‘कृष्णा’ येथे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीवेळी त्यांनी अपात्र बीपीएल कार्डांचा शोध रद्द करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. अपात्र बीपीएल कार्डधारकांना स्वेच्छेने कार्ड परत करण्यासाठी वेळ द्यावा. त्यानंतर अपात्र बीपीएल कार्डांचा शोध घेऊन नोटीस बजावून टप्प्याटप्प्याने रद्द करण्याची प्रक्रिया हाती घ्या, अशी सूचना केली.
काही महिन्यापूर्वीच 4 हजार सरकारी कर्मचाऱ्यांजवळील बीपीएल रेशनकार्डे रद्द करण्यात आली आहेत. अन्नभाग्य योजनेच्या थेट रोख हस्तांतरण अंतर्गत 4,692 कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहेत, तर ऑक्टोबर अखेरपर्यंत 3,253 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 4,44,48,294 लाभार्थी याचा लाभ घेत आहेत.
पेट्रोल पंपांच्या तपासणीचा वेग वाढवा!
रेशनधान्य वितरण योजना तळागाळातून मजबूत करण्यासाठी जागृती समितीमध्ये जनतेचा सहभाग वाढवावा. समितीची नियमितपणे बैठका होत असल्याची खातरजमा करून घ्यावी. राज्यात एकूण 4,518 पेट्रोल पंप आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत 503 पेट्रोल पंपांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीचा वेग आणखी वाढविला पाहिजे. मोजमाप व गुणवत्तेत फसवणूक यासारख्या गैरप्रकारांना चाप लावावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. किमान आधारभूत दराने धान्य खरेदी करण्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्था करावी. शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी सर्व प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात 1.53 कोटीहून अधिक रेशनकार्डे
राज्यात 1,53,69,945 रेशनकार्डे असून 5,30,88,636 सदस्य लाभार्थी आहेत. अन्न-नागरी पुरवठा खात्यात एकूण 709 पदे रिक्त असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच एक राष्ट्र एक रेशनकार्ड योजनेंतर्गत कर्नाटकात दुसऱ्या राज्यांमधील 13,383 लाभार्थी रेशनधान्याचा लाभ मिळवत आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.
8,500 कार्डधारक अन्न सुविधेचे लाभार्थी
बीपीएल कुटुंबात 80 वर्षांवरील एकमेव व्यक्ती असेल तर त्यांना घरपोच आहारधान्य पोहोचविण्याची ‘अन्न सुविधा’ योजना जारी करण्यात आली आहे. 8,500 रेशनकार्डधारक या योजनेचा लाभ घेत आहेत, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.









