लक्षद्वीपमध्ये पाणबुड्यांनी महत्त्वाचा शोध लावला आहे. 17 व्या किंवा 18 व्या शतकातील युरोपीय युद्धनौकेचे अवशेष त्यांच्या हाती लागले आहेत. पाणबुडे लक्षद्वीप बेटसमुहातील कल्पेनी बेटानजीक सागरी जीवसृष्टीचा शोध घेत असताना त्यांना ही युद्धनौका मिळाली आहे. बेटाच्या पश्चिम काठावर हे अवशेष सापडले आहेत. जहाजाचे अवशेष तीन युरोपीय देशांशी (पोर्तुगाल, डच किंवा ब्रिटिश) संबंधित असल्याचे संशोधकांचे मानणे आहे. हा या क्षेत्रातील अशाप्रकारचा पहिला शोध असल्याचे सांगण्यात येत आहे. जहाजाच्या अवशेषांवरुन आता पुढील अध्ययन केले जात आहे.
17 व्या आणि 18 व्या शतकात सागरी संघर्षांशी या अवशेषांचा ऐतिहासिक संबंध असू शकतो असे या अध्ययनात आढळून आले आहे. खासकरून मध्यपूर्व आणि श्रीलंकेदरम्यान व्यापारमार्गावरून प्रभुत्वाची लढाई सुरू असताना हे जहाज बुडले असण्याची शक्यता आहे. घटनास्थळावरून एक तोफ मिळाली असून जहाजाचा आकार पाहता ती युद्धनौका राहिली असावी. ही युद्धनौका लोखंड आणि लाकडाद्वारे तयार करण्यात आली होती. कल्पेनीच्या पश्चिम किनाऱ्यावर हे अवशेष मिळाले आहेत. प्रारंभी ही युद्धनौका असल्याची जाणीव नव्हती. काही काळानंतर तेथे एक तोफ आणि नांगरही मिळाला.
अशा स्थितीत हा मोठा शोध असू शकतो, याची जाणीव झाली असे एका संशोधकाने म्हटले आहे. इदरीस बाबू विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात कार्यरत आहेत. ते पाणबुड्यांच्या समुहाचे मार्गदर्शक आहेत. या क्षेत्रात अशा जहाजाचे अवशेष यापूर्वी मिळाले नव्हते. हे जहाज 50-60 मीटर लांब राहिले असावे. ईस्ट इंडिया कंपनी 17 व्या किंवा 18 व्या शतकात या व्यापार मार्गावर लेखंडी जहाजांचा वापर करत होती. यासंबंधी अधिक जाणून घेण्यासाठी पाण्याखाली पुरातात्विक अध्ययनाची गरज भासेल असे इदरीस बाबू यांनी म्हटले आहे.









