तिरुपतीमधील दुर्घटनेबद्दल माहिती उघड : मृतांचा आकडा 6 वर, निष्काळजीपणासंबंधी प्रशासनाकडून तपास
वृत्तसंस्था/तिरुमाला
आंध्रप्रदेशातील तिरुपती येथील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात विशेष दर्शनासाठी टोकन घेताना चेंगराचेंगरी झाली. या गोंधळादरम्यान 4 हजारांहून अधिक भाविक प्रभावित झाले. प्राथमिक तपासाअंती भाविकांची गर्दी आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे 6 जणांचा मृत्यू झाला. टोकन घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर तिला अन्यत्र हलविण्यासाठी दरवाजा उघडल्यामुळे लोकांची झुंबड उडाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरवर्षी वैकुंठ एकादशीला लाखो भाविक तिरुपती वैकुंठद्वारमार्गे दर्शन घेण्यासाठी दाखल होत असतात. या खास दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक तिरुपतीला भेट देण्यासाठी येतात. यंदा वैकुंठद्वार दर्शन 10 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान होणार आहे. या विशेष दर्शनासाठी टोकन वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. 9 जानेवारीच्या सकाळपासून टोकन वाटप करण्यात येणार होते, परंतु बुधवार, 8 जानेवारीच्या रात्रीपासून लोक त्यासाठी जमू लागल्यानंतर गर्दी वाढत असताना चेंगराचेंगरी झाली.
मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमागील कारणही समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहा जखमींपैकी मल्लिका नावाची एक महिला अचानक आजारी पडली. तिला रुग्णालयात नेण्यासाठी दरवाजे उघडण्यात आल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. घटनेनंतर तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) बोर्ड सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत चेंगराचेंगरीसंबंधी सखोल चर्चा झाली. त्यानंतर ‘टीटीडी’ अध्यक्ष बी. आर. नायडू यांनी ‘तिरुपती मंदिरात झालेली चेंगराचेंगरी प्रशासनाच्या चुकीमुळे झाली’ अशी कबुली दिली. सदर चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला, 40 जण जखमी झाले, आम्ही वैद्यकीय सुविधा पुरवत आहोत. टीटीडीच्या इतिहासात असे कधीही घडले नाही. मी भक्तांची मनापासून माफी मागतो. यासंबंधी आम्ही आणखी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू, असेही देवस्थानम समितीकडून स्पष्ट करण्यात आले.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख
या घटनेत जखमी झालेल्या भाविकांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी गुरुवारी सकाळी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली. तसेच सर्व रुग्णांवर योग्य उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. या दुर्घटनेत प्राण गमावणाऱ्या भाविकांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. तसेच जखमींचा सर्व खर्च प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.









