सोमनाथ रायकर /मडगाव
गोव्यातील एका पीडित युवतीला फिर फिर फिरवले, लैंगिक अत्याचार केले, विवाह करण्यास टाळाटाळ करु लागला, तिच्या नावाने आरोपीने रोख रकमेलाही फसविले. चोहोबाजुनी अत्याचार झालेल्या या पीडित युवतीला न्यायदानाच्या पवित्र क्षेत्रात कार्यरत असलेल्या सारिका फळदेसाई नेतृत्व करीत असलेल्या एका प्राधिकरणाने 5 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला आणि ही रक्कम पीडित युवतीच्या खात्यात जमा झालीही. न्या. सारिका फळदेसाई या दक्षिण गोव्याच्या कायदा सेवा प्राधिकरणाच्या सचिव आहेत. ‘दी गोवा कंपेन्सेशन स्कीम फॉर वुमन विक्टीम/ सर्व्हाव्हल ऑफ सेक्शुअल असॉल्ट/ अधर क्राईम्स-2018’ या योजनेखाली न्या. सारिका फळदेसाई यांनी ही भरपाई या पीडित युवतीला मिळवून दिली आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की सदर युवतीवर तिच्याच ओळखीच्या युवकाने लैंगिक अत्याचार केले. पीडित युवतीच्या भावाकडून आरोपीने हजारो रुपये घेऊन फसविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आरोपी धिरज कद्रोली याच्याविरुद्ध कोलवा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंद करुन 5 एप्रिल 2019 रोजी अटक केली. त्यानंतर या आरोपीला 10 एप्रिल 2019 रोजी अनेक अटी घालून जामिनावर सोडून देण्यात आले. न्यायालयात खटला सुरु झाला आणि या आरोपीला मडगावच्या सत्र न्यायाधीश पुजा कवळेकर यांच्या न्यायालयाने 10 वर्षाची कैदेची शिक्षा ठोठावली. शिवाय 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला आणि दंडाची ही रक्कम पीडित युवतीला देण्याचा आदेश दिला. या पीडित युवतीला ‘दी गोवा कंपेन्सेशन स्कीम फॉर वुमन विक्टीम/ सर्व्हाव्हल ऑफ सेक्शुअल असॉल्ट/ अधर क्राईम्स-2018’ या योजनेखाली साहाय्य मिळण्यासाठी अर्ज करण्याची शिफारस सत्र न्यायालयाने आपल्या आदेशात केली.
त्यानुसार गोवा स्टेट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीकडे पीडित युवतीने अर्ज केला. या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी हा अर्ज दक्षिण गोव्यात पाठविण्यात आला. विविध निकषातून गेल्यानंतर दक्षिण गोव्याच्या कायदा सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. सारिका फळदेसाई यानी पीडित युवतीला 5 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला आणि ही रक्कम पीडित युवतीच्या खात्यात जमाही झाली असल्याची माहिती न्यायालयातील सूत्रानी दिली. जीवनात हताश झालेली ही युवती आपल्या पायावर उभी राहण्याचा सध्या प्रयत्न करीत आहे.









