1 नोव्हेंबर 2016 रोजी आयोजित मूक सायकल फेरीत राज्यविरोधी घोषणा दिल्याचा ठेवला होता ठपका
बेळगाव : काळ्यादिनानिमित्त 1 नोव्हेंबर 2016 रोजी काढण्यात आलेल्या मूक सायकल फेरीवेळी काकेरू चौक शहापूर येथे लाल-पिवळ्या पताका फाडल्या, गोवावेस येथे दगडफेक करून नुकसान करणे, कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करणे, कन्नड-मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या खटल्यातून म. ए. समितीच्या 37 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सरकारतर्फे संशयितांवर गुन्हा साबीत करता न आल्याने तृतीय जेएमएफसी न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
श्रीकांत कदम, विठ्ठल पाटील, दत्ता येळ्ळूरकर, बापू भडांगे, सतीश कुगजी, रामचंद्र पाटील, महेश पाटील, राहुल कुरणे, राहुल पाटील, यशोधन नेसरकर, सचिन पाटील, सचिन कदम, विक्रम मुतगेकर, मनोहर काकतकर, संतोष बांडगी, लोकनाथ रजपूत, रोहन पाटील, सूरज शिंदोळकर, राघवेंद्र येळ्ळूरकर, गजानन पोटे, संदीप मोटेकर, श्रीनिवास पोळ, राजन मजुकर, रवी मजुकर, सार्थक मास्तमर्डी, स्वप्निल देसाई, जयदीप उपसकर, चांगदेव मुचंडीकर, संतोष मुचंडीकर, भुजंग लाड, षण्मुख चोपडे, राजू हितलमनी, शंकर जाधव, इंद्रजित पाटील, संदीप कडेमनी, सुशांत रेडेकर अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत.
1 नोव्हेंबर 2016 रोजी मराठी भाषिकांच्यावतीने मूक सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सायकल फेरी शहापूर येथील काकेरू चौकात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी लाल-पिवळ्या पताका फाडल्या. त्यानंतर कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच गोवावेस येथील अमर एम्पायर इमारतीवर दगडफेक करून तोडफोड केली होती. त्यामुळे शहापूर पोलिसांनी 43 जणांविरोधात भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेऊन गुन्हा दाखल केला.
तत्कालीन पोलीस निरीक्षक डी. सी. लक्कण्णावर यांनी तपास करून 2017 मध्ये न्यायालयात दोषारोप दाखल केले. त्यामुळे या खटल्याची सुनावणी तृतीय जेएमएफसी न्यायालयात सुरू होती. या खटल्यातील दोघा संशयितांचा मृत्यू झाला तर दोघांना न्यायालयाने वगळले होते. त्याठिकाणी सरकार पक्षातर्फे संशयितांवर गुन्हा साबीत न करता आल्याने न्यायालयाने 37 जणांची निर्दोष मुक्तता केली. या सर्वांच्यावतीने ॲड. महेश बिर्जे, ॲड. प्रताप यादव, ॲड. एम. बी. बोंद्रे,ॲड. बाळासाहेब कागणकर, ॲड. वैभव कुट्रे, ॲड. रिचमॅन रिकी यांनी काम पाहिले.









