सर्व्हे विभागाचा असल्याचे निष्पन्न : ग्रामस्थांनी सोडला नि:श्वास
बेळगाव : होनगा येथील एका शिक्षण संस्थेच्या मैदानावर सोमवारी सायंकाळी उतरलेल्या ड्रोनमुळे परिसरात एकच खळबळ माजली. गावकऱ्यांनी हा ड्रोन काकती पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. चौकशीअंती मैदानावर उतरलेला ड्रोन सरकारी असल्याचे आढळून आले आहे. सोमवारी सायंकाळी होनगा येथील एका मैदानावर ड्रोन येऊन पडला. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये या ड्रोनविषयी कुतूहल व धास्ती निर्माण झाली. काकती पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी होनग्याला धाव घेतली. तोपर्यंत नागरिकांनी वादग्रस्त ड्रोन ताब्यात घेतला होता.
नागरिकांनी सोपविलेला ड्रोन काकती पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचे मूळ शोधण्याचे काम हाती घेतले. तोपर्यंत यासंबंधीची माहिती संपूर्ण परिसरात पसरली होती. जवळपास अनेक आस्थापने आहेत. लष्करी प्रशिक्षण केंद्रही आहे. त्यामुळे मैदानावर उतरलेला ड्रोन कोणाचा? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. सर्व्हे विभागाचे अधिकारी काकती पोलीस स्थानकात दाखल झाले. मैदानावर उतरलेला ड्रोन आपला असल्याचे त्यांनी सांगितले. यासंबंधीची कागदपत्रेही त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे दिली. ड्रोनच्या माध्यमातून सर्व्हे करण्यात येत आहे. सर्व्हेची कामे सुरू असताना बॅटरी संपून ड्रोन कोसळला असणार, असा संशय त्यांनी व्यक्त केला. कागदपत्रांची पडताळणी करून पोलिसांनी ड्रोन सर्व्हे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविला. त्यामुळे निर्माण झालेला संशय दूर झाला.









