वाढीव तिकीट दर लागू : सर्वसामान्यांना चटका
बेळगाव : जीवनावश्यक वस्तुंच्या महागाईची झळ सहन कराव्या लागणाऱ्या जनतेला आता वाढत्या तिकीट दराचा चटका सहन करावा लागणार आहे. कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने तिकीटदरात 15 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे विविध मार्गावर प्रवाशांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. वाढत्या इंधन दरांमुळे आणि शक्ती योजनेमुळे परिवहनवर अतिरिक्त आर्थिक बोजा वाढला आहे. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाने तिकीटदर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2022 मध्ये तिकीट दरात 12 टक्क्यांनी वाढ झाली होती. परत आता 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे लांब पल्ल्यासह स्थानिक प्रवास महागला आहे.
महिलांसाठी शक्ती योजनेतंर्गत मोफत प्रवास मिळत असला तरी पुरुषांना मात्र या वाढत्या तिकीट दराची झळ सोसावी लागणार आहे. स्थानिक प्रवासात प्रत्येक स्टेजनिहाय एक ते दोन रुपयांची वाढ झाली आहे. तर लांब पल्ल्याच्या प्रवासात तब्बल 25 ते 70 रुपयांपर्यंत जादा पैसे मोजावे लागणार आहेत. शहरांतर्गत वडगाव, शहापूर, अनगोळ, उचगाव, येळ्ळूर, सांबरा, बेळगुंदी, पिरनवाडी, हलगा, काकती, होनगा, सुळेभावी, कणबर्गी या मार्गावरही तिकीट दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशालाही कात्री लागणार आहे. या मार्गावर दोन ते तीन रुपयांनी तिकीट दरात वाढ झाली आहे. जीवनावश्यक वस्तू, इंधन, गॅस पाठोपाठ परिवहनने बस तिकीट दरातही वाढ केल्याने सर्वसामान्यांना वाढत्या महागाईला सामोरे जावे लागणार आहे.










