पदवीपूर्व शिक्षण विभागाचे निकालवाढीसाठी प्रयत्न
बेळगाव : पीयुसी द्वितीय वर्षाची पूर्वतयारी परीक्षा बुधवार दि. 15 पासून होणार आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुख्य परीक्षा होणार असल्याने पूर्वतयारी परीक्षा लवकर घेतली जाणार आहे. पदवीपूर्व शिक्षण विभागाने पूर्वपरीक्षेची जय्यत तयारी केली असून निकालवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्त्वाची असलेली बारावीची मुख्य परीक्षा लवकरच होणार आहे. या परीक्षेची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी पूर्वतयारी परीक्षा घेतली जाते. 15 ते 27 जानेवारी दरम्यान बारावीची पूर्वतयारी परीक्षा होणार आहे. विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बेळगाव जिल्हा पदवीपूर्व कॉलेज नोकर महामंडळाच्यावतीने नुकतेच वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
यावर्षी 21 हजार विद्यार्थी देणार परीक्षा
पीयुसी द्वितीय वर्षात सध्या शिकत असलेले 21 हजार 517 नियमित विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. याबरोबरच यापूर्वी अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थीदेखील बहिस्थ पद्धतीने परीक्षा देणार आहेत. त्यामुळे ही संख्या 23 ते 24 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकते. त्यादृष्टीने पदवीपूर्व शिक्षण विभागाने परीक्षेची तयारी सुरू केली आहे.
पीयुसी द्वितीय वर्ष पूर्वतयारी परीक्षा वेळापत्रक
तारीख विषय
- बुधवार दि. 15 जाने. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी
- गुरुवार दि. 16 जाने. इंग्रजी
- शुक्रवार दि. 17 जाने. कन्नड, मराठी, उर्दू
- शनिवार दि. 18 जाने. इतिहास, भौतिकशास्त्र
- सोमवार दि. 20 जाने. हिंदी व संस्कृत
- मंगळवार दि. 21 जाने. पॉलिटीकल सायन्स, सांख्यिकी
- बुधवार दि. 22 जाने. जीवशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, समाजशास्त्र
- गुरुवार दि. 23 जाने. बिझनेस स्टडी, गणित, कन्नड (पर्यायी)
- शुक्रवार दि. 24 जाने. अर्थशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स
- शनिवार दि. 25 जाने. अकौंटन्सी, रसायनशास्त्र, शिक्षण
- सोमवार दि. 27 जाने. भूगोल, मानसशास्त्र, भूगर्भशास्त्र
निकालवाढीसाठी अनेक उपक्रम
पीयुसी द्वितीय वर्षाची परीक्षा जवळ आल्याने निकालवाढीसाठी पदवीपूर्व विभागाने अनेक उपक्रम राबविले आहेत. सध्या अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांचे अधिक वर्ग भरविले जात आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आले असून निकालवाढीसाठी प्रयत्न केला जात आहे.
– एम. एम. कांबळे (पदवीपूर्व शिक्षणाधिकारी)









