आजोबांच्या जागी नातवाचे आधारकार्ड रद्द : हिंडलगा तलाठ्याचा प्रताप
बेळगाव : आजोबाचा मरण उतारा देताना मयत समजून हिंडलग्याच्या तलाठ्यांनी अर्जदार नातवाचेच आधारकार्ड रद्द केल्याचा प्रताप उघडकीस आला आहे. आधारकार्ड रद्द झाल्याने संबंधिताचे रेशनकार्डवरील नावही रद्द होण्यासह सरकारकडून मिळणाऱ्या सर्व योजना रद्द झाल्या आहेत. गणपती खाचू काकतकर, रा. सावगाव असे सदर इसमाचे नाव आहे. सध्या ते हयात असले तरी सरकारी दफ्तरी मात्र त्यांना मृत दाखविण्यात आले आहे. या चुकीची दुरुस्ती करून देण्यासाठी ते गेल्या सहा महिन्यांपासून हिंडलग्याचे तलाठी मंजुनाथ तिप्पोजी यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. पण त्यांना कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर सोमवार दि. 6 रोजी त्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. सावगाव येथील तक्रारदार गणपती यांच्या आजोबांचे 1976 मध्ये निधन झाल्याने त्यांनी मरण उतारा मिळावा, यासाठी तहसीलदारांकडे अर्ज केला होता. मात्र, त्यावेळचे रेकॉर्ड आपल्याकडे नसल्याचे सांगण्यात आल्याने गणपती यांनी न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने मयत मष्णू यांचा मरण उतारा देण्याचा आदेश बेळगाव तहसीलदारांना बजावला होता.
जिवंत असूनही सरकार दप्तरी मृत दाखविल्याने सोयीसुविधा रद्द
त्यानुसार नातू गणपती यांनी न्यायालयाच्या आदेशपत्रासोबत आपल्या आधारकार्डाची झेरॉक्स प्रत अर्जासोबत जोडून ती हिंडलग्याचे तलाठी मंजुनाथ तिप्पोजी यांच्याकडे दिली होती. तलाठ्याने आजोबा मष्णू काकतकर यांच्या नावे मरण उतारा दिला. मात्र, अर्जदार गणपती यांचे आधारकार्ड नंबर त्यामध्ये दाखल करण्यात आल्याने नातवाचे आधारकार्डच रद्द झाले. त्यामुळे 3 ऑगस्ट 2023 पासून गणपती यांचे आधारकार्ड निष्क्रिय झाले आहे. सध्या ते हयात असले तरी सरकारदरबारी मात्र मृत ठरले आहे. त्यामुळे सरकारकडून मिळणाऱ्या इतर सोयीसुविधा रद्द झाल्या आहेत.
तहसीलदारांनीही केले हात वर
झालेली चूक दुरुस्त करून देण्यात यावी, यासाठी ते गेल्या सहा महिन्यांपासून तलाठ्याकडे पाठपुरावा करत आहेत. पण त्यांना कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार स्वीकारून ती आपल्या सहीनिशी प्रांताधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईसाठी पाठवली आहे. याबाबत माहिती अधिकार हक्काखाली तहसीलदारांकडे अर्ज करण्यात आला होता. पण याबाबत आपला काही संबंध नसल्याचे अजब उत्तर तहसीलदारांनी दिले आहे.









