कचऱ्याचे वर्गीकरण न करताच विल्हेवाट : आरोग्य विभाग अधिकारी, ठेकेदार अन् कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
बेळगाव : शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचा आदेश लागू होऊन वर्ष उलटले असले तरीही वर्गीकरणाचे दहा टक्के उद्दिष्ट गाठण्यात यश आलेले नाही. त्यामुळे दररोज शेकडो टन सुका आणि ओला कचऱ्याचे वर्गीकरण न करताच त्याची विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे वर्षाकाठी महापालिकेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. महानगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या परिसरात दररोज 220 ते 250 मेट्रिक टन ओला आणि सुका कचरा निर्माण होतो. या कचऱ्यापैकी एकूण 74 टक्के ओला कचरा असतो. पण महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही योजना फोल ठरत आहे. शहर व उपनगरात कचऱ्याची समस्या वाढण्यासह कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने शास्त्राsक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आता पुन्हा एकदा महापालिका पुढे सरसावली आहे.
कचराकुंड्या खराब असल्याने कचरा बाहेर
शहर, उपनगर व बाजारपेठेतील कचरा टाकण्यासाठी महापालिकेकडून ठिकठिकाणी 450 हून अधिक कचराकुंड्या (कंटेनर) ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, बहुतांश कचराकुंड्या पूर्णपणे खराब झाल्या आहेत. कचराकुंड्यांमध्ये टाकण्यात आलेला कचरा व इतर टाकाऊ पदार्थ कुंड्यातून बाहेर पडत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. इतकेच नव्हे तर लहान दवाखाने आणि औषध दुकानातील ई-कचराही कचराकुंड्यांमध्ये किंवा खुल्या जागेत टाकला जात आहे. त्यामुळे ई-कचऱ्याची समस्या देखील गंभीर बनली आहे.
हायटेक कचरा विल्हेवाटीची यंत्रणा अर्धवट
कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी 2022-23 मध्ये दक्षिण विभागात अठरा हायटेक सुविधा आणि सेन्सर असलेले डस्टबीन बसविण्यात आले आहेत. एका डस्टबीनसाठी 1.56 ते 6.5 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या डस्टबीनमध्ये जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र वाहन व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे हायटेक कचरा विल्हेवाटीची यंत्रणा अर्धवट पडली आहे.









