शिवशंभू तीर्थ स्मारकाच्या पूजनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उद्गार
बेळगाव : अनगेळवासियांसाठी आजचा सोहळा हा ऐतिहासिक आहे. अनगोळ ग्रामस्थांच्या मनातील भावना आणि इच्छा अनेक दशकानंतर आज पूर्ण होत आहेत. या छत्रपती संभाजी चौकात संभाजी महाराजांची मूर्ती बसविण्याचे स्वप्न होत ते आज पूर्ण होत आहे. आज आम्ही भाग्यवान आहोत की आज हा सोहळा आम्हाला पहायला मिळत आहे, असे उद्गार महाराष्ट्र राज्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले. अनगोळ धर्मवीर संभाजी चौक येथील शिवशंभू तीर्थ स्मारकाच्या पूजनाच्या प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, शिवाजी महाराज हे एक दैवी अवतार होते. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठ्यांचे नव्हते. त्यांनी अठरापगड जातीला एकत्र कऊन आपले स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवराय कुण्या एका जातीच्या विरोधात लढले नाहीत. जिथे अन्याय झाला तिथे तिथे शिवाजी महाराज लढले आणि त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केले. म्हणून सर्वांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यायला हवा, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले,
अनगोळ धर्मवीर संभाजी चौक येथील शिवशंभू तीर्थ स्मारकाचे पूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. सायंकाळी अनगोळ नाका येथून शोभायात्रेला सुरवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व सातारा जावळीचे आमदार, महाराष्ट्र राज्याचे मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले आणि शोभायात्रेला सुरवात करण्यात आली. यावेळी शोभायात्रेत ढोलपथक, ध्वजपथक, अश्व यांचा सहभाग होता. तसेच सुवासिनी कलश घेऊन शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. तसेच ठिकठिकाणी रस्त्यावर
रांगोळी काढण्यात आली होती. तर युवकांच्या डोकीवर भगवी टोपी आणि फेटे बांधण्यात आले होते. शोभायात्रा अनगोळ मुख्य रस्त्यावरून धर्मवीर संभाजी चौक इथपर्यंत काढण्यात आली. यानंतर संभाजी महाराजांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक केला. यानंतर महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण व माजी महापौर शोभा सोमणाचे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीवर पाच नद्यांच्या जलाचा अभिषेक कऊन पाद्यपूजा केले. यानंतर संभाजी महाराजांच्या मूर्तीला हार घालून पुजा करण्यात आली. यावेळी उपस्थित महापौर व उपमहापौर व मान्यवरांच्या हस्ते प्रमुख पाहुणे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पुष्पगुच्छ व मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर सविता कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व जिजाऊ यांच्या नावांचा जयघोष केला. यावेळी आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









