बेळगाव : अनगोळ येथील बहुचर्चित धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा तणावपूर्ण वातावरणात रविवार पार पडला. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच मुख्य रस्त्याकडे येणारे पर्यायी रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते. अनगोळ येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यावरून गेल्या काही दिवसांपासून दोन गटात धुसफूस सुरू आहे. एका गटाने रविवारी पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, चौथऱ्याचे काही काम शिल्लक असतानाच घाईगडबडीत लोकार्पण सोहळा उरकण्यात येऊ नये, अशी मागणी दुसऱ्या गटाकडून केली जात होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी भेट देऊन पाहणी केली.
जिल्हा प्रशासन योग्य तो निर्णय घेईल. सर्वांनी आपापल्या घरी रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले होते. पण एका गटाकडून रविवारी सकाळपासूनच चौथऱ्याच्या आवारात सजावट करण्यासह लोकार्पण करण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे याला दुसऱ्या गटाने आक्षेप घेतला. कार्यकर्ते धर्मवीर संभाजी चौकात दाखल झाले. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना माघारी धाडले. सायंकाळी 4 पर्यंत धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती बांधलेले शेडनेस कायम होते. तसेच चौथऱ्याच्या प्रवेशद्वारावर महानगरपालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर व त्यांचे सहकारी सकाळपासून थांबून होते. सायंकाळी 4 च्या दरम्यान महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण पुतळ्याच्या ठिकाणी दाखल झाले. पण प्रवेशद्वार लोखंडी पत्रा लावून बंद ठेवण्यात आले होते.
महापौरांनी अधीक्षक अभियंत्या निपाणीकर यांना पत्रा हटवून मार्ग खुला करून देण्यास सांगितले. मात्र, त्यांनी त्याला नकार दिला. त्यावर एखाद्या कर्मचाऱ्याला सांगून पत्रा बाजूला करण्याची सूचना महापौरांनी केली. पण त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने महापौरांनी स्वत: प्रवेशद्वारावरील पत्रा बाजूला केला. त्यानंतर महापौर आणि उपमहापौरांनी चौथऱ्यावर चढून पुतळ्याची पाहणी केली. महापौर-उपमहापौर निघून गेल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी पुतळ्याच्या भोवती बांधलेले शेडनेस व इतर साहित्य हटवले. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्वत: पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे व वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस सातत्याने फेरफटका मारून घडामोडींवर नजर ठेवून होते. अनगोळ मुख्य रस्त्याकडे येणारे पर्यायी रस्ते दुपारपासूनच पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद ठेवले होते. यावेळी दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. एकंदरीत तणावाच्या वातावरणात धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला.









