कॅपिटल वन एकांकिका स्पर्धेत दोन सत्रात सात एकांकिका सादर
बेळगाव : कॅपिटल वन सोसायटीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एकांकिका स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एकूण सात एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रंगमंचाचे विधिवत पूजन झाले. दिवसभरात ‘ट्रेलर’, ‘कलम 375’, ‘ओळख’ व ‘दशावतार’ या एकांकिकांचे पहिल्या सत्रात तर दुसऱ्या सत्रात ‘चरचरणाऱ्या फँटसीचे युद्ध’, ‘लेखकाचा कुत्रा’ व ‘नदीकाठचा प्रवास’ या एकांकिका सादर करून उपस्थित रसिकांना खिळवून ठेवण्यात आले.
डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक कॉलेज, कोल्हापूर यांनी ‘ट्रेलर’ ही एकांकिका सादर केली. ज्यांची कुणाशी मैत्री होत नसते त्यांना मैत्रीची गरज असते. त्याविरुद्ध सतत न्यायासाठी मंडळींमधील संघर्ष एकांकिकेतून दाखविण्यात आला. कोल्हापूर येथील परिवर्तन कला फाऊंडेशनने ‘कलम 375’ ही एकांकिका सादर केली. स्त्रियांवर नेहमीच बलात्कार होतात. पण पुरुषांवर बलात्कार झाला तर काय परिस्थिती ओढवते, हे एकांकिकेतून सादर करण्यात आले. तसेच न्यायालयात होणाऱ्या संघर्षाचे दर्शन एकांकिकेतून झाले.
पुणे येथील दृष्टी या संस्थेने ‘ओळख’ एकांकिका सादर केली. रेल्वेस्टेशनवर थांबलेल्या एका तरुणीसमोर एक तरुण प्रकट होतो. तो तिची जुनी ओळख दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्या दोघांची ओळख आहे की नाही? हे प्रेक्षकांना शेवटपर्यंत समजत नाही. उत्सुकता वाढवणाऱ्या संवादातून त्यांची ओळख होती, हे सरतेशेवटी समजते. गोवा येथील अभय थिएटर अकादमीने ‘दशावतार’ ही एकांकिका सादर केली. एका जुन्या नाट्याकलाकाराचा सत्कार करताना तो बेशुद्ध पडतो व त्याच्यासमोर दशावतारातील प्रल्हादाची कथा सादर केली जाते, तेव्हा तो शुद्धीवर येतो. त्याचा उत्साहही वाढतो. हे पात्र दशावताराच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मंगसुळी येथील गणेश नाट्या कला मंचने ‘धिंड’ एकांकिका सादर केली. दारूबंदीचा आदेश असूनही गावातील एकजण दारू पिल्याचे निदर्शनास येते. त्या व्यक्तीची धिंड काढली जाते. ही धिंड काढताना झालेल्या गमतीजमती आणि शेवटी त्याने दारू सोडल्याचा निश्चय एकांकिकेतून दाखवण्यात आला आहे. कोल्हापूर येथील टीम स्पॉटलाईट यांनी ‘वर्दी’ ही एकांकिका सादर केली. प्रचंड भूक आणि दारिद्र्यात खितपत पडलेल्या दोघांची ही कथा आहे. इचलकरंजी येथील फोर्थ वॉल थिएटरने ‘लॉटरी’ एकांकिका सादर करून गरिबीचा प्रवास दाखविण्यात आला. मूल आणि घराचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या आयुष्यात अचानक कसा बदल होतो, हे यातून दाखविण्यात आले.









