नागरिकांतून तीव्र संताप : कचऱ्याची उचल करण्याची मागणी
बेळगाव : शहरातील कचरा उचल समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असतानाच दुसरीकडे कचऱ्याला पेटवून देण्याचे प्रकारही घडत आहेत. वडगाव ते येळ्ळूर दरम्यानच्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला असून त्याला पेटवून दिले जात असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. शहर उपनगरातील कचरा उचल करण्याची जबाबदारी महानगरपालिकेवर आहे. कचऱ्याची उचल केल्यानंतर त्याची योग्यरित्या विल्हेवाट लावण्याचे काम आरोग्य खात्याकडून केले जाते. पण कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी विलंब लागत असल्याने नागरिकांनी कचरा देताना ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्याची सूचना केली जात आहे. कचरा कोठेही न टाकता महानगरपालिकेतर्फे ठिकठिकाणी ठेवण्यात आलेल्या कचराकुंडीतच कचरा टाकण्यात यावा, अशी सूचना सातत्याने केली जात आहे. पण, बहुतांश जण अद्यापही जागा मिळेल त्या ठिकाणी कचरा फेकून देत आहेत. परिणामी जिकडेतिकडे मिनी कचरा डेपो निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
कचरा गोळा करताना सफाई कर्मचाऱ्यांची कसरत
प्लास्टिक, सुका आणि ओला कचरा गोळा करताना सफाई कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. कार, मोटारसायकलवरून जाणाऱ्या लोकांकडून खुल्या जागेच्या ठिकाणी कचरा फेकून दिला जात आहे. विशेष करून उपनगरात कचऱ्याची समस्या अधिक गंभीर बनत आहे. कारण रस्त्याच्या कडेला झाडाझुडपात कचरा टाकून देण्याचे प्रमाण वाढले आहे. येळ्ळूर रोडवर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा टाकून देण्यात आला आहे. मात्र, सदर कचऱ्याची उचल करण्याऐवजी तो पेटवून दिला जात असल्याने परिसरात प्रदूषण होत असल्याने नागरिकातून नाराजी व्यक्त केली जात आहे. याकडे मनपाच्या आरोग्य खात्याने लक्ष देऊन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी केली जात आहे.









