म्यानमारमध्ये बंडखोरांचे सैन्य विजयाच्या उंबरठ्यावर
वृत्तसंस्था/ यंगून
युनायटेड लीग ऑफ अराकान (युएलए) आणि त्याचे सैन्य अराकान आर्मी स्वत:चे लक्ष्य प्राप्त करण्याच्या समीप पोहोचली आहे. हे लक्ष्य आहे स्वातंत्र्य प्राप्त करण्याचे, एक स्वतंत्र देश स्थापन करण्याचे. अराकान आर्मीने म्यानमार युनियनच्या रखाइन (पूर्वीचे अराकान) राज्याच्या 18 पैकी 15 शहरांवर यापूर्वीच कब्जा केला आहे. परंतु अद्याप तीन महत्त्वाची ठिकाणं म्यानमारच्या सैन्याच्या ताब्यात आहेत.
बंगालच्या उपसागरातील सित्तेव बंदर अद्याप म्यानमारच्या सैन्याच्या नियंत्रणात असून हे बंदर कालाधान मल्टीमॉडेल प्रकल्पाच्या अंतर्गत भारताच्या मदतीने विकसित करण्यात आले आहे. तर चीनच्या मदतीने क्याउकफ्यू बंदर आणि मुआनांग शहरावर म्यानमारच्या सैन्याचे नियंत्रण आहे.
2024 वर्षाच्या अखेरच्या दिवशी अराकान आर्मीने ग्वा शहर स्वत:च्या कब्जात घेतले. तर मागील आठवड्यात बंडखोर अराकान आर्मीने अन शहरावर नियंत्रण मिळविले होते. याच क्षेत्रात म्यानमारच्या सैन्याच्या पश्चिम कमांडचे मुख्यालय असून यावर अराकान आर्मीचे नियंत्रण पाहता तेथील स्थिती वेगाने बदलत असल्याचे स्पष्ट होते.
काही दिवसांपूर्वी अराकान आर्मीने माउंगडॉ नगरला सैन्याच्या हातून हिसकावून घेतले होते आणि याचबरोबर अराकान आर्मीचे बांगलादेशला लागून असलेल्या सीमेवर पूर्णपणे कब्जा झाला होता. बंडखोर गट पूर्ण रखाइन प्रांतावर कब्जा करणे आणि स्वातंत्र्याची घोषणा करण्यास यशस्वी ठरले तर हे 1971 मध्ये बांगलादेशच्या जन्मानंतर आशियात पहिले यशस्वी फुटिरवादी सैन्य अभियान ठरणार आहे. यामुळे भारताच्या शेजारी एक नवा देश उदयास येऊ शकतो.
रखाइन प्रांताचे बहुतांश हिस्से आणि चिन राज्यातील रणनीतिक शहर पलेतवावर नियंत्रण प्रस्थापित केल्यावर युनायटेड लीग ऑफ अराकान-अराकान आर्मीने सैन्य जुंटाशी चर्चा करण्यावर सहमती दर्शविली आहे. दोन्ही बाजूंनी याकरता चीनच्या मध्यस्थीत झालेल्या हाइगेंग कराराची मदत घेतली आहे. जानेवारी 2024 मध्ये चीनच्या नेतृत्वात झालेल्या करारात सैन्य तोडग्यांऐवजी राजकीय संवादातून अंतर्गत मुद्द्यांवर तोडगा काढण्यास तयार राहणार असल्याचे नमूद होते.
भारत आणि चीनला विश्वासात घेणार
युनायटेड लीग ऑफ अराकानने एका वक्तव्यात ‘विदेशी राष्ट्रां’ना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला आहे. युनायटेड लीग ऑफ अराकानचे हे वक्तव्य चिनी भाषेतही जारी करण्यात आले आहे. रखाइन राज्यात विदेशी गुंतवणूक म्हणजेच भारत आणि चीनच्या गुंतवणुकीचे रक्षण करणार असल्याचे या वक्तव्यात म्हटले गेले आहे. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या सक्रीय नेतृत्वाचे कौतुक करत अराकान आर्मीने अराकान पीपल्स रिव्होल्युशनरी सरकार सर्व विदेशी गुंतवणुकींचे स्वागत करते आणि अराकान क्षेत्राला लाभ पोहोचवत याचा विकास आणि प्रगतीत सहकार्य करणाऱ्यांना मान्यता देत असल्याचे म्हटले आहे. गुंतवणूक, प्रकल्प आणि व्यवसायांमध्ये सामील लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष काळजी घेऊ असेही अराकान आर्मीने म्हटले आहे. अराकान आर्मीचे हे वक्तव्य या संघटनेच्या वरिष्ठ सैन्य नेते आणि भारत तसेच चीनच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांच्या गुप्त बैठकीनंतर समोर आले आहे.
राजनयिक मान्यतेसाठी प्रयत्न
युनायटेड लीग ऑफ अराकान-अराकान आर्मी सित्तवे आणि क्याउकफ्यूवर कब्जा करण्यासाठी थेट आक्रमण करणार का चिनी आणि भारतीय प्रतिक्रियांचे आकलन करण्यासाठी प्रतीक्षा करणार हे अद्याप स्पष्ट नाही. अराकान आर्मीला हा विजय म्यानमारकडून वायुदल आणि नौदलाच्या वापरानंतरही मिळाला आहे. तर खरोखरच स्वातंत्र्य मिळाले तर राजनयिक मान्यता मिळविण्याच्या शक्यतांवर विचार करण्यासाठी अराकान आर्मी चर्चेसाठी तयार झाल्याचे जाणकारांचे मानणे आहे. आशिया आणि पश्चिमात्य देशांकडून मान्यता मिळविल्याशिवाय युनायटेड लीग ऑफ अराकानचा स्वतंत्र देशाचा उद्देश पूर्ण होणार नाही.









