केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांचे आवाहन : डॉ. एस. जी. देसाई प्रतिमेचे अनावरण
प्रतिनिधी/ बेळगाव
वैद्यकीय सेवा ही ईशसेवा, पवित्र सेवा आहे. डॉक्टरांचा प्रामाणिकपणा, निष्ठेने वैद्यकीय सेवा करण्याची पद्धत, रुग्णांना विश्वासात घेऊन उपचार करण्याची पद्धत डॉक्टरांनी अवलंबिली पाहिजे, असे मत केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले.
जेएनएमसीच्या 1971-90 च्या माजी विद्यार्थ्यांतर्फे गुरुवंदना कार्यक्रम शनिवार दि. 4 रोजी झाला. या निमित्ताने महाविद्यालयाच्या ग्रंथालय आवारात माजी प्राचार्य व धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एस. जी. देसाई यांच्या प्रतिमेचे अनावरण डॉ. कोरे यांनी केले. व्यासपीठावर केएलई संस्थेचे अध्यक्ष महांतेश कौजलगी, संचालक डॉ. व्ही. एस. साधुन्नावर, डॉ. एच. बी. राजशेखर, डॉ. व्ही. डी. पाटील, काहेरचे डॉ. नितीन गंगणे, प्राचार्या डॉ. एस. एन. महांतशेट्टी, उपप्राचार्य डॉ. व्ही. एम. पट्टणशेट्टी, डॉ. राजेश पवार आदी उपस्थित होते.
बालरोगतज्ञ डॉ. देसाई यांनी मुलांची मानसिक जडणघडण उत्तम पद्धतीने जाणून घेतली होती. राज्याने पाहिलेले डॉ. देसाई हे एकमेव वैद्यकीय शिक्षक आहेत. केएलई संस्थेच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात 13 वर्षे प्राचार्य व प्राध्यापक म्हणून सेवा बजावत त्यांनी महाविद्यालयाला उच्च पातळीवर नेले. त्यांचे अध्यापन आदर्शवत आहे, असेही डॉ. कोरे म्हणाले.
त्यानंतर मूळचे अथणी येथील व अमेरिकास्थित डॉ. संपतकुमार शिवणगी यांनी विचार मांडले. डॉ. प्रभाकर कोरेंच्या दूरदृष्टीमुळे केएलई संस्थेचे नाव विश्वाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे, असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले. डॉ. संपतकुमार व डॉ. उदया शिवणगी दांपत्याचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.









