अनगोळ परिसराला भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ येथे धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी शनिवारी सायंकाळी अनगोळला भेट देऊन पाहणी केली. पुतळा अनावरण कधी करायचे? हे लवकरच ठरवण्यात येणार असून रविवारी सर्वजणांनी आपापल्या घरी रहावे. या परिसरात कोणी येऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या तारखेवरून दुमत निर्माण झाल्यामुळे अनगोळ परिसरात गेल्या दोन दिवसांपासून तणावाची स्थिती होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी धर्मवीर संभाजी चौक परिसराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस आयुक्तांबरोबरच मनपा आयुक्त शुभा बी., लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह महसूल व पोलीस खात्यातील अनेक अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हा प्रशासनाच्यावतीने या समस्येवर तोडगा काढण्यात आला आहे. आपण स्वत: व पोलीस आयुक्त या चर्चेत भाग घेतला होता. पुतळ्याचे लोकार्पण कधी करायचे? याविषयी नेते व कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले आहे. ‘उद्या तुम्ही तुमच्या घरी रहा. प्रशासनावर विश्वास ठेवा. पोलीस व जिल्हा प्रशासन आपले कर्तव्य योग्यरीतीने पार पाडेल’, असे त्यांनी सांगितले.
पुतळ्याचे लोकार्पण कधी करायचे? याविषयी चर्चा झाली आहे. तारीख ठरवून महानगरपालिकेकडून यासाठी आवश्यक तयारी केली जाईल तोपर्यंत सर्वांनी शांतता पाळावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. यावेळी रमाकांत कोंडुसकर, विनायक गुंजटकर यांच्यासह अनेक प्रमुख उपस्थित होते. पुतळा लोकार्पणावरून वादंग माजल्यामुळे रविवारी ठरविण्यात आलेला कार्यक्रम होणार की नाही? यासंबंधी संभ्रम निर्माण झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी या परिसरात कोणी येऊ नये, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, तणावाच्या पार्श्वभूमीवर अनगोळ परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रविवारी सकाळपासून शहरातील बहुतेक अधिकारी व पोलिसांना या परिसरात बंदोबस्तासाठी जुंपण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग हे स्वत: या परिसरातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.









