वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
येथे सुरु असलेल्या ब्रिस्बेन खुल्या आंतरराष्ट्रीय पुरुष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत टॉप सिडेड आर्यना साबालेंकाने महिला एकेरीची अंतिम फेरी गाठताना रशियाच्या अँड्रीव्हाचा पराभव केला. आता साबालेंका आणि रशियाची कुडेरमेटोव्हा यांच्यात रविवारी जेतेपदासाठी लढत होईल.
शनिवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य सामन्यात साबालेंकाने रशियाच्या मीरा अँड्रीव्हाचा 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. दुसऱ्या उपांत्य लढतीत रशियाच्या 21 वर्षीय कुडेरमेटोव्हाने युक्रेनच्या कॅलिनीनाचे आव्हान 6-4, 6-3 असे संपुष्टात आणत अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत पुरुष विभागात झेकच्या लिहेकाने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.









