राज्यात बेळगाव जिल्हा दुसऱ्या स्थानावर : बेंगळूर शहरात सर्वाधिक
बेळगाव : राज्यात 2021 ते 2023 या तीन वर्षांत 28,324 पुरुषांनी आत्महत्या केली असून ही संख्या आत्महत्या केलेल्या महिलांच्या संख्येपेक्षा तीनपटीने अधिक आहे. या कालावधीत 8,159 महिलांनी आत्महत्या केली आहे. पुरुष आणि महिला आत्महत्या करण्याचे प्रमाण बेंगळूर शहरात सर्वाधिक तर बेळगाव जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर, बेंगळूर, शिमोगा व तुमकूर जिल्ह्यांचा क्रमांक लागते. या तीन जिल्ह्यांत प्रत्येकी एक हजाराहून अधिक जणांनी आत्महत्या केली आहे. राज्य गुन्हे नोंदणी विभागाकडून ही माहिती उपलब्ध झाली आहे.
आत्महत्येची आकडेवारी
2021 मध्ये पुरुष (9,243), महिला (2,713), 2022 मध्ये पुरुष (9,523), महिला (2,783) व 2023 मध्ये पुरुष (9,558), महिला (2,663) पुरुषांचे आत्महत्येचे प्रमाण प्रतिवर्षी वाढतच असून महिलांचे प्रमाण कमी असल्याचे राज्य गुन्हे नोंदणी विभागाने म्हटले आहे. कर्जबाजारी झाल्याने, कौटुंबिक कलहातून, एकाकीपणामुळे, आजाराला कंटाळून, प्रेमप्रकरणातून, व्यसनामुळे, ल़ैंगिक समस्या, पत्नीच्या कटकटीमुळे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे, अनैतिक संबंधामुळे यासारख्या कारणातून आत्महत्येचे प्रकार घडले आहेत.
समुपदेशन करणे गरजेचे
आत्महत्येच्या घटनांची वाढती संख्या ही समाजमन सुन्न करणारी आहे. नैराश्यग्रस्तांचे डॉक्टर, समाज अभ्यासक यांच्याकरवी समुपदेशन करून त्यांना धीर देण्याचे प्रयत्न सामाजिक संस्था, संघटनांकडून होणे गरजेचे असल्याचे राज्य गुन्हे नोंदणी विभागाने म्हटले आहे.









