कराड :
पत्नी जास्त बोलत असून भांडण करत असल्याचा राग आल्याने पतीने पत्नीचा गळा दाबून तिचा निर्घृण खून केला. विंग (ता. कराड) येथील विंग हॉटेल येथील फ्लॅटमध्ये बुधवारी रात्री हा खून झाला. मयूरी मयूर कणसे (वय 24) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती मयूर यशवंत कणसे (वय 30) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांच्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या भांडणातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली. खुनाच्या घटनेने विंग परिसरात खळबळ उडाली आहे.
खून प्रकरणी संशयिताचा चुलत भाऊ विशाल सदाशिव कणसे (वय 25, रा. विंग हॉटेल) याने कराड तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयूर कणसे आणि मयूरी यांचा सन 2018 साली विवाह झाला होता. विवाहानंतर मयूरी हिचे सासरच्या लोकांशी वारंवार वाद होत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या वादातून मयूर व मयूरी या पती–पत्नीने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला असावा.
वेगळे झाले अन् अघटित घडले
गेल्या चार महिन्यांपासून संशयित मयूर हा पत्नी मयूरीसह विंग हॉटेल येथे एका फ्लॅटमध्ये भाड्याने वास्तव्यास होते. त्यांना एक मुलगा होता. मात्र त्यांच्यातील वाद कायम होता, असे विशाल कणसे यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. नववर्षाचा जल्लोष सर्वत्र सुरू असतानाच बुधवारी रात्री पती मयूर व पत्नी मयूरी यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. बराचवेळ वाद सुरू असलेला वाद एका क्षणी अगदी टोकाला पोहोचला. यातूनच पती मयूर हा चिडला होता.
गळा दाबला…फोन करून सांगितले
रागाच्या भरात असलेल्या मयूरने पत्नी मयूरी हिचा गळा दाबून निर्घृण खून केला. ती अंथरूणावर निपचित पडल्यानंतर संशयिताने त्याच्या चुलतभावाला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास फोन केला. मयूरी जास्तच बोलायला लागल्याने मी तिचा गळा दाबला, असे त्याने चुलत भावाला फोनवर सांगितले. यावर चुलतभावाने त्याला तू वेडा आहेस का? अशा शब्दात सुनावले. त्यानंतर चुलतभाऊ विशाल याच्यासह महेश कणसे यांनी संशयित राहात असलेल्या फ्लॅटकडे धाव घेतली. फ्लॅटमधे मयूरी निपचित पडून तिच्या नाकातून रक्त येत होते. त्यांनी हा प्रकार चुलत्यांसह मित्रांना सांगितला. त्या सर्वांनी खासगी कारमधून मयूरी हिस उपचारासाठी कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात नेले. मात्र मयूरीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
पोलिसांकडून पहाटेपर्यंत चौकशी
पतीने पत्नीचा खून केल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सज्जन जगताप, नितीन येळवे, प्रफुल्ल गाडे, किरण बामणे यांच्यासह पोलीस पथक उपजिल्हा रूग्णालयात दाखल झाले. तेथे पाहणी करून पोलीस फौजफाटा विंग येथे घटनास्थळी आला. संशयिताला पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली. नेमका हा प्रकार कोणत्या कारणातून घडला, याचा अजूनही तपास सुरू आहे.
चिमुकल्याचे छत्र हरपले…
मयूर व मयूरी या दाम्पत्याला तीन वर्षांचा मुलगा आहे. तो बुधवारी झोपला असताना हा प्रकार घडला. आईचे छत्र कायमचे हरपले तर पित्याला खून प्रकरणी गजाआड व्हावे लागले. त्यामुळे सध्याच्या स्थितीत हा तीन वर्षांचा चिमुकला आई वडिलांच्या मायेला पोरका झाला.








