कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष बदलावरून सत्ताधाऱ्यांमध्येच दोन गट पडले होते. या दोन गटाचा वाद टोकाला पोहचल्याने चित्रपट महामंडळाची जाहीर झालेली निवडणूक स्थगित करावी लागली. एवढेच काय पण अर्थकारणावरून एकमेकांवर गुन्हे नोंदवत उच्च न्यायालयात दावाही करण्यात आला. सत्ताधाऱ्यांच्या भांडणात विरोधकांनी उडी घेत आगीत तेल ओतले. दोन गटातील भांडणात चित्रपट महामंडळाचे मोठे नुकसान होत असल्याच्या भावना अनेक कलाकारांनी बोलून दाखवल्या. त्यामुळे आता चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्षांनी दोन पावले मागे येत समझोता करण्याचा प्रस्ताव एकमेकांपुढे ठेवला आहे. आज (दि. 3) कर्जत जामखेड येथील एन. डी. स्टुडीओच्या उद्घाटनानंतर होणाऱ्या बैठकीत वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
गेल्या पाच वर्षापुर्वी कोल्हापुरातील शहाजी कॉलेजमध्ये झालेल्या संचालकांच्या बैठकीत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांना अध्यक्षपदावरून पायउतार करण्यात आले. तेथून चित्रपट महामंडळाच्या संचालक मंडळातील वाद टोकाला पोहचला होता. कोरोना कालावधीत तर साखर आणि पैसे चोरल्याच्या कारणावरून एकमेकांवर गुन्हे नोंदवण्यात आले. ऐवढेच काय पण उपाध्यक्षांनीच अध्यक्षांना विरोध करण्यासाठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकले. तसेच अध्यक्षांनी किती रूपयांचा भ्रष्टाचार केला याचे फलक लावून हिशोबच केला होता. हे प्रकरण येवढयावरच थांबले नाही तर अध्यक्षांनी व्हिडीओ व्हायरल करीत उपाध्यक्षांसह अन्य संचालकांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा आढावा घेतला होता. परिणामी दोन्ही गटातील वाद आणखीनच चिघळला. त्यानंतर जयप्रभा स्टुडीओच्या आंदोलनात अध्यक्ष, उपाध्यक्षांनी एकमेकांची गळाभेट घेतली. अन् कलाकारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर निवडणूकीच्या तारखा दोघांनीही वेगवेगळ्या जाहीर केल्या. हा वाद कोर्टात गेल्यानंतर प्रशासक नेमूण निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. परंतू सदस्य संख्येवरून पुन्हा प्रकरण उच्च कोर्टात गेले. अशा अनेक घडामोडी गेल्या पाच वर्षात झाल्या. यामध्ये चित्रपट महामंडळाच्या सदस्य संख्या व मिळणाऱ्या निधीतही घट झाली. याची झळ महामंडळाला सोसावी लागत आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाचे कलाकारांकडून स्वागत होत आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाविषयी वाटाघाटी होतील
अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर, माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूकीनंतर मेघराज राजेभोसले अडीच वर्ष अध्यक्ष तर विजय पाटकर अडीच वर्ष अध्यक्ष असतील. तर धनाजी यमकर पाच वर्षे उपाध्यक्ष असतील असा प्रस्ताव पुढे आला आहे. यावर आज (दि. 3) कर्जत जामखेडमध्ये चर्चा होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होईल, असे नसले तरी वाद मिटवण्याच्य दृष्टीने प्रयत्न होईल हे निश्चित. दोन्ही गट समन्वयाने वाद मिटवण्यास तयार असल्याने येत्या काही दिवसात चित्रपट महामंडळाची निवडणूक कार्यक्रम पुन्हा जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एक पाऊल मागे येण्यास तयार
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या फायद्यासाठी आम्ही एक पाऊल मागे येण्यास तयार आहे. कलाकारांच्या हितासाठी समन्वयाची भूमिका घेणार आहे. परंतू सभासदांचे हित अबादीत राखून समन्वय करणार. सध्या पंधरा कोटीची संपत्ती असली तरी पुढील पाच वर्षात शंभर कोटींची संपत्ती करण्याचा मानस असल्याचेही अध्यक्ष मेघराज राजेभोसले व उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी सांगितले.
तुमचा वाद मिटवा
गेल्या पाच वर्षापासून चित्रपट महामंडळाचे कामकाज ठप्प आहे. त्यामुळे तुमचे काय ते मिटवा आणि महामंडळाच्या हितासाठी काम करा, अशी कलाकारांकडून वारंवार मागणी होवू लागली आहे. त्यामुळे चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांनी समझोता करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन मित्र अखेर एकच
गेल्या पाच वर्षापुर्वी मेघराज राजेभोसले आणि धनाजी यमकर या दोन मित्रांनी एकत्रितपणे निवडणूक लढवत सत्ताधाऱ्यांचा सुपडासाप करीत चित्रपट महामंडळावर सत्ता स्थापन केली. दोघांच्या समन्वयाने दोन वर्षे कारभार सुरळीत सुरू होता. परंतू एका कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि गेली पाच वर्षे हा वाद टोकाला पोहचला होता. परंतू पुन्हा दोन मित्र अखेर एकच असल्याचे दाखवून दिले आहे.








