कोल्हापूर :
गवा रेड्याच्या दोन वेगवेगळ्या धडकेत तिघे तरुण जखमी झाले आहे. महेश युवराज विचारे (वय 33), त्याचा भाऊ अमोल युवराज विचारे (वय 29, दोघे रा. नांदारी, ता. शाहूवाडी), संतोष मेधू राठोड (वय 40, मुळ रा. देहुर तांडा, सध्या रा. डोणोली, ता. शाहूवाडी) अशी त्यांची नावे आहेत. या तिघांना उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले आहे. या घडल्या प्रकाराची माहिती समजताच वन अधिकाऱ्यांनी सीपीआरमध्ये धाव घेऊन, जखमीची विचारपूस केली. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.
जखमी संतोष राठोड शेतीच्या कामानिमित्ताने कुटुंबीयासह डोणोली येथे आला आहे. तो बुधवारी रात्री मान परळी (ता. शाहूवाडी) येथील शेतातील काम करुन, राहत्या घरी येत होता. यावेळी अचानक त्याच्या अडवा आलेल्या गवा रेड्याने धडक दिली. या धडकेत तो जखमी झाला. याची माहिती समजताच त्यांच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.
ही घटना ताजी असताना नांदारी येथील महेश विचारे आणि त्याचा भाऊ अमोल विचारे हे दोघे बुधवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास कामावऊन घरी दुचाकीवऊन जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला गवा रेड्याने धडक दिली. या धडकेने हे दोघे भाऊ दुचाकीसह उडून रस्त्यावर जोरात आदळल्याने जखमी झाले. या दोघा जखमींना त्यांच्या घरच्यांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे.








