रोहितचे स्थान अनिश्चित, पिंक कसोटी आजपासून, जखमी आकाश दीप बाहेर
वृत्तसंस्था/सिडनी
चेंडूला मिळणारी अतिरिक्त उसळी आणि सीम मूव्हमेंट यामुळे अपेक्षेसारखी कामगिरी न करता येण्यासह नेतृत्वावरही टीका झालेला भारताचा कर्णधार रोहित शर्माची कसोटी क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द निराशाजनक समाप्तीकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. त्याला आज शुक्रवारपासून येथे सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीत वगळण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मेलबर्नप्रमाणेच रोहित जाळ्यात सरावासाठी प्रवेश करणाऱ्या मान्यताप्राप्त फलंदाजांमध्ये शेवटचा राहिला. परंतु मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने शुक्रवारी सकाळी नाणेफेक होताना फॉर्मात नसलेला कर्णधार तिथे असेल की नाही याची पुष्टी करण्यास नकार दिल्याने हे घडले. ‘खेळपट्टी पाहून आम्ही संघरचनेवर निर्णय घेऊ’, असे गूढ उत्तर गंभीरने रोहित खेळणार का, या प्रश्नावर दिले. जर तसे घडले, तर खराब फॉर्ममुळे वगळलेला रोहित हा पहिला भारतीय कर्णधार बनेल आणि त्याबद्दल त्याला कुणाला दोषही देता येणार नाही. कारण पाच डावांत अवघ्या 31 धावा त्याला करता आल्या आहेत.
बुमराह नेतृत्व सांभाळण्याची चिन्हे
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, जो 20 हून कमी सरासरीने चार सामन्यांमध्ये 30 बळी घेऊन संघाचा अव्वल कामगिरी करणारा खेळाडू ठरला आहे, तो अशा परिस्थितीत नेतृत्वाची भूमिका स्वीकारेल, असे दिसून येत आहे. बुमराहच्या नेतृत्वाखालीच भारताने दौऱ्यातील एकमेव कसोटी पर्थमध्ये जिंकली होती. महेंद्रसिंह धोनी आणि अनिल कुंबळे यांनीही मालिका चालू असतानाच निवृत्ती पत्करली. कारण त्यांचे शरीर क्रिकेटच्या सर्वांत दीर्घ प्रकाराचा ताण आणखी पेलू शकत नव्हते. तथापि, रोहितला फॉर्ममुळे वगळण्यात येईल. आपल्या मार्गदर्शनाखालील संघात एखादा खेळाडू फक्त कामगिरीच्या जोरावर ड्रेसिंग रूममध्ये राहील, असे गंभीरने आधीच स्पष्ट केलेले आहे. जर रोहित आज शुक्रवारी नाणेफेकीसाठी बाहेर पडला नाही, तर कसोटी फलंदाज या नात्याने तो एमसीजीवरील सामन्यात आपली शेवटची खेळी खेळला, असा निष्कर्ष काढता येईल. तिथेही तो खेळपट्टी चांगली असून देखील पूर्णपणे सूर गमावलेल्या स्थितीत दिसला.
गिल तिसऱ्या क्रमांकावर येणार
गंभीरने संघरचना स्पष्ट केलेली नसली, तरी भारत शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर परत आणेल असे पुरेसे संकेत आहेत. ‘जोपर्यंत ड्रेसिंग रूममध्ये प्रामाणिक लोक आहेत तोपर्यंत भारतीय क्रिकेटचे संक्रमण सुरक्षित हातात आहे. त्या ड्रेसिंग रूममध्ये राहण्यासाठी कामगिरी हा एकमात्र निकष आहे’, असे गंभीरने सामनापूर्व पत्रकार परिषदेत सांगितले. भारत 1-2 असा पिछाडीवर असताना ऑस्ट्रेलियाचा आणखी एक विजय जागतिक कसोटी स्पर्धेतील अंतिम सामन्यातील त्यांचे स्थान निश्चित करेल.
गंभीर-रोहित विसंवाद उघड
गुरुवारी गौतम गंभीर जसप्रीत बुमराहला घेऊन सिडनी क्रिकेट मैदानाच्या खेळपट्टीकडे निघाला तेव्हा सुमारे दीड वाजले होते. काही मिनिटांनंतर रोहित शर्मा देखील या दोघांना येऊन मिळाला. परंतु मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यात क्वचितच संवाद झाला. त्यानंतर गंभीरने सामनापूर्व पत्रकार परिषदेत पाचव्या आणि अंतिम कसोटीसाठीच्या संघात रोहितचे स्थान निश्चित नसल्याचे संकेत दिले. सहसा अशा पत्रकार परिषदेला कर्णधार उपस्थित असतो. त्यानंतर लगेचच गंभीर बुमराहशी संभाषणात गुंतलेला दिसला, तर त्याचे बाकीचे सहकारी वार्मअप करताना दिसले. मिळालेल्या माहितीनुसार, एक प्रभावशाली क्रिकेट प्रशासक, ज्याला बीसीसीआयमध्ये खूप आदर आहे, त्याने मुख्य प्रशिक्षकाशी कर्णधाराला सिडनीत खेळण्याची परवानगी देऊन त्याने नंतर कसोटीतून निवृत्त व्हायचे, असा तोडगा चालतो का, यासंदर्भात बोलणी केलेली आहे.
ऑस्ट्रेलिया-पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कोन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, ब्यू वेबस्टर, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड आणि नॅथन लायन.
भारत-रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, नितीशकुमार रे•ाr, तनुष कोटियन, सर्फराज खान.
सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वा.









