आम्ही सर्व स्वत:च्या जीवनातील सर्वात आनंदी काळाबद्दल विचार करतो तेव्हा आम्हाला शाळेचे दिवस आठवतात. तो काळ निरागस अन् कुठलीही काळजी न करायला लावणारा असतो. शिक्षण आणि मित्रांमुळे शालेय जीवन खूपच वेगळे असते. परंतु प्रौढत्व येण्यासोबत अनेक गोष्टी बदलतात, पण आठवणी कायम राहतात. शालेय जीवन नेहमीच आठवणीत राहते. अनेकदा तो काळ पुन्हा जगता यावे अशी इच्छा मनात दाटून येते. तो काळ परत येणार नसला तरीही तो अनुभव पुन्हा मिळविता येऊ शकतो. जपानमध्ये एका कंपनीने पर्यटकांना एक दिवसासाठी शालेय जीवन जगण्याची संधी देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
जपानची कंपनी अनडूकाइयाने पर्यटकांसाठी एक कार्यक्रम सुरू केला असून याचे नाव युअर हाय स्कूल ठेवण्यात आले आहे. याच्या अंतर्गत जपानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना माध्यमिक शाळेत शिकण्याची संधी दिली जाते. हा एक दिवसाचा कार्यक्रम असतो आणि पूर्ण कोर्स इंग्रजीत संचालित होतो. यात पर्यटकांना शालेय गणवेश परिधान करण्यासाठी दिला जातो. त्यांना क्लब अॅक्टिव्हिटीज करायला दिल्या जातात आणि जपानी टीव्ही सीरिजप्रमाणे अनुभव मिळवून दिला जातो. एकप्रकारे या पर्यटकांना जपानमधील शालेय संस्कृतीची ओळख करून दिली जाते.
विद्यार्थी होण्याचे शुल्क
एक दिवसाकरता विद्यार्थी होण्याची संधी ही 30 हजार येन खर्च केल्यावर मिळणार आहे. यानंतर संबंधितांना वर्ग उपलब्ध करून दिला जातो आणि एका दिवसात 30 जणांना विद्यार्थी होता येते. क्लासिक युनिफॉर्म परिधान करणार का सूट याचा निर्णय पर्यटकांनी घ्यायचा असतो. पर्यटकांसोबर शिक्षक असतील आणि वर्गात त्यांना कॅलियोग्राफी शिकविली जाते. वर्गात डिजास्टर ड्रिल, इमर्जन्सी स्कील आणि पारंपरिक नृत्यही शिकविले जाते. जेवणानंतर क्रीडाप्रकार करविले जातात. मनोरंजनाकरता काही खोडकर मुले वर्गात असतील. तर अखेरीस संबंधित पर्यटकांना वर्गाची सफाई करावी लागते. हा प्रकार जपानी शाळांच्या शिक्षणांचा महत्त्वाचा हिस्सा आहे.









