गुप्तचर विभागाकडून अलर्ट जारी : स्लीपर सेल सक्रिय; साधूंच्या वेशात पोलीस तैनात
वृत्तसंस्था/नवी दिल्ली, प्रयागराज
महाकुंभ-2025 ला हल्ल्याद्वारे लक्ष्य करण्याचा कट काही दहशतवादी संघटनांनी रचल्याची माहिती उजेडात आली आहे. इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) आणि लोकल इंटेलिजन्स युनिटने (एलआययु) यासंबंधी उत्तर प्रदेश सरकारच्या गृह विभागाला एक गोपनीय अहवाल पाठवला आहे. गेल्या आठवड्यात पाठवलेल्या या अहवालात खलिस्तानी आणि पाकिस्तानी दहशतवादी प्रॉक्सीद्वारे महाकुंभला लक्ष्य करू शकतात, असा दावा करण्यात आला आहे. या सोहळ्याला टार्गेट करण्याच्या उद्देशाने आपली स्लीपर सेल सक्रिय करण्याचे कामही दहशतवादी संघटनांनी सुरू केल्याचे समजते.
उत्तर प्रदेश स्थानिक गुप्तचर केंद्राच्या मते, दहशतवादी कुंभमेळ्यातील गर्दीत साधू, पुजारी, अघोरी आणि भगवे कपडे परिधान करून प्रवेश करू शकतात. आयबीच्या अहवालातही असेच काही इनपुट्स देण्यात आले आहेत. त्यामुळेच महाकुंभात साधूंच्या वेशात गुप्त पोलीस तैनात करण्यात येत असून, ते गर्दीतील प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवू शकतात. कुंभमेळ्यातील गर्दीच्या ठिकाणी, आखाड्यातील पंडाल आणि संगमाच्या काठावर ते तैनात केले जातील. हा अहवाल गांभीर्याने घेत राज्याच्या गृह विभागाने आपल्या सर्व तपास यंत्रणात सक्रिय केल्या आहेत. कुंभमेळ्यात एटीएस, आयबी, एसटीएफ, एलआययू, बॉम्ब निकामी पथक आणि एनआयएची पथके कार्यरत आहेत. तसेच या अहवालानंतर पोलीस विभाग आणि सायबर सेलने 6 हजारांहून अधिक सोशल मीडिया प्रोफाईल शोधले आहेत. टेहळणी आणि कॉल इंटरसेप्शनद्वारे अनेक संशयितांवर 24 तास नजर ठेवली जात आहे.
गुप्तचर विभागाच्या अलर्टनंतर महाकुंभ परिसरात प्रवेश करणाऱ्या लोकांची चौकशी सुरू झाली आहे. प्रत्येक प्रवेशद्वारावर पोलीस कर्मचारी संशयितांवर नजर ठेवून आहेत. संशयित वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. संशयास्पद वाहने आणि लोकांचे फोटो काढून पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या डेटाबेसशी जुळवून घेतले जात आहेत. याशिवाय, एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन आणि ड्रोनविरोधी यंत्रणांसह महाकुंभ सोहळ्याची सुरक्षा अधिक मजबूत करण्यात आली आहे.
राज्य पोलीस मुख्यालयातून जारी करण्यात आलेला गोपनीय अहवाल प्रयागराजचे पोलीस आयुक्त, अधीक्षक, माहिती महासंचालक, कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुख, एटीएसचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांना पाठवण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणाची वेगवेगळ्या स्तरावर चौकशी सुरू झाली आहे. या तपासादरम्यान राज्य गुप्तचर विभागाला एका संशयास्पद सोशल मीडिया अकाउंटची माहिती मिळाली. त्यात दहशतीची ‘सिक्रेट कोड’ नोंदवली आहे.
बिहारी तरुणाकडून धमकी
नासर पठाण नावाच्या तरुणाने 31 डिसेंबर रोजी महाकुंभात बॉम्बस्फोट करून 1000 हिंदूंना मारले जाईल, अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी प्रयागराज कोतवाली येथे गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्याच्या सोशल मीडिया पेजवर तरुणाने स्वत:ला भवानीपूर, पूर्णिया (बिहार) येथील रहिवासी असल्याचे सांगितले आहे. सायबर पोलीस स्टेशन या प्रकरणाचा तपास करत आहे. संबंधित इन्स्टाग्राम अकाउंट युजरची माहिती गोळा केली जात आहे.
खलिस्तानींकडूनही इशारा
खलिस्तानी दहशतवादी पन्नूने यापूर्वी 24 डिसेंबरला खलिस्तान जिंदाबाद फोर्सच्या माध्यमातून महाकुंभला धमकी दिली होती. याप्रकरणी पिलीभीत पोलिसांनीही गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सुरू आहे. अशा धोक्यांना तोंड देण्यासाठी प्रशासनाने त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे. यापूर्वी ही सुरक्षा व्यवस्था 13 जानेवारीपासून कार्यान्वित होणार होती. परंतु आता 31 डिसेंबरच्या रात्रीपासून ते कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यानुसार महाकुंभात प्रवेश करताना अनेक ठिकाणी तपासणी यंत्रणा बसवण्यात आली आहे. याशिवाय अंडरवॉटर ड्रोनचा वापर केला जात आहे.









