कोल्हापूर :
सातारा–कोल्हापूर डेमू रेल्वेच्या वेळेत बदल करण्याची मागणी कोल्हापूर प्रवासी संघटनेने केली होती. मध्य रेल्वेने अखेर ही मागणी मान्य केली. बुधवार 1 जानेवारीपासून काही रेल्वेच्या सुटण्याच्या वेळेत बदल केला आहे. यामध्ये सातारा–कोल्हापूर डेमूचाही समावेश आहे. यामुळेच प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार सातारा डेमू कोल्हापुरात अर्धातास अगोदरच म्हणजेच सकाळी 9.26 वाजता कोल्हापुरात आली. यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. .
सांगली, मिरज, जयसिंगपूर, हातकणंगले येथून रोज कोल्हापुरात येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शासकीय, निमशासकीय, खासगी क्षेत्रातील कर्मचारी, अधिकारी, व्यावसायिकांचा समावेश आहे. ही रेल्वे सकाळी दहा ते सव्वा दहाच्या दरम्यान कोल्हापुरात येत होती. स्टेशनपासून पुन्हा कार्यालयात किंवा शाळा–कॉलेजमध्ये जाण्यासाठी अवधी लागत होता. यामुळे कर्मचाऱ्यांना ऑफीसमध्ये लेटमार्क पडत होता. तर विद्यार्थी वेळेत जावु शकत नव्हते.
मध्य रेल्वे प्रशासनाने काही रेल्वेच्या वेळेत बदल केला असून आज, बुधवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामध्ये कोल्हापुरातून सुटणाऱ्या 11 तसेच कोल्हापुरात येणाऱ्या 3 रेल्वेचा समावेश आहे. यात सातारा–कोल्हापूर डेमूचाही समावेश आहे. पहिल्याच दिवशी ही रेल्वे सकाळी 9.26 वाजता कोल्हापुरात आली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळली आहे. याचबरोबर नवीन वेळेनुसार कोल्हापूर–पुणे डेमू पहाटे 5 वाजता ऐवजी पहाटे 5.10 मिनटे, कोयना एक्स्प्रेस सकाळी 8.15 ऐवजी सकाळी 8.25, हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेस सकाळी 9.10 ऐवजी सकाळी 9.35, कोल्हापूर–मिरज डेमू सकाळी 10.30 ऐवजी सकाळी 10.25, कोल्हापूर–तिरूपती सकाळी 11.40 ऐवजी सकाळी 11.45 वाजता, कोल्हापूर अहमदाबाद दुपारी 1.15 ऐवजी दुपारी 1.30, महाराष्ट्र एक्स्प्रेस दुपारी 2.45 ऐवजी दुपारी 2.50, कलबुर्गी एक्सप्रेस दुपारी 3 ऐवजी दुपारी 3.05 वाजता, कोल्हापूर–सांगली डेमू सायंकाळी 7.40 ऐवजी सायंकाळी 7.35 आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्री 8.50 ऐवजी रात्री 8.55 वाजता या बदलेल्या वेळेनुसार सुटल्या.








